सामना अग्रलेख – पुण्यातील त्रांगडे; टिळकांना अभिवादन!

देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी श्री. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालीइंडिया फ्रंटच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. नेते मोदींसोबत व्यासपीठावर कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी, गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन!

गरीबांच्या चुकांपेक्षा मोठय़ांचीच पातके

लोकांस अधिक भोगावी लागता

                                                    – लोकमान्य टिळक

टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भव्य मंडप, पायघडय़ा वगैरे घातल्या आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आपले पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन विधिवत पूजाअर्चा, अभिषेक, आरती वगैरे करणार आहेत. पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसब्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे मोदी भेटीत भाजप स्वतःचीही महाआरती करून घेईल. हे सर्व ते करतील याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आधी हा पुरस्कार इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, साईरस पुनावाला, एस. एम. जोशी अशा महान लोकांना देण्यात आला. या लोकांमुळे पुरस्कारही मोठा झाला. मोदी हे आज पंतप्रधान आहेत. त्यांनी जनतेत देशभक्तीची भावना जागवली, भारत आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न सुरू केले या कारणांसाठी त्यांना टिळक पुरस्कार देण्यात येत आहे. हिंद स्वराज ट्रस्टवर सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून बरेच जण काँग्रेस विचारांचे आहेत. त्यात शरद पवारसुद्धा आहेत व काँग्रेस वगैरे लोकांनी मिळून मोदी यांना टिळक पुरस्कार जाहीर केला व मोदींनी तो अर्थात स्वीकारला. मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते; पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. त्यामुळे टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत. अर्थात विचारभिन्नता असली तरी कर्तबगारी, राष्ट्रसेवा त्यांच्या अंगी असेल तर तो देण्यास हरकत नाही; पण मोदी यांना पुरस्कार देण्यात एकप्रकारची अपरिहार्यता दिसते. टिळकांच्या संघर्षातून मिळालेल्या स्वराज्यास गुलामीच्या बेडय़ांत जखडणाऱ्या नेत्यांना टिळकांच्या नावाचा पुरस्कार देणे, त्या पुरस्कारासाठी अशा नावाची शिफारस करणे हे आश्चर्यच आहे. अशा वेळी टिळकांचेच

एक वचन

आम्हाला आठवते, “असा कोणताही धंदा किंवा आश्रम नाही की लबाडांनी किंवा अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही. मग तो राज्य करण्याचा धंदा असो की भीक मागण्याचा धंदा असो.’’ टिळकांनी जे सांगितले ते आता रोज घडत आहे. आता मुख्य विषयाकडे वळू. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी श्री. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. आज टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत व श्री. शरद पवार हे तर मोदींचा सन्मान करतील. ते या सोहळय़ाचे मुख्य अतिथी आहेत. पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात थोडी जरी चीड असती तर ‘‘अशा भ्रष्ट वगैरे लोकांच्या हातून मी टिळकांच्या नावे पुरस्कार स्वीकारणार नाही व यापैकी एकही व्यक्ती मंचावर किंवा मंडपात असता कामा नये,’’ असे त्यांनी आयोजकांना बजावून सांगायला हवे होते. मोदी हे कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते ते मोदींचा सन्मान करतील. मोदी तो स्वीकारतील. याचा दुसरा अर्थ असा की, मोदी व त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत व फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले व लोकांत भय निर्माण केले. दुसरे आश्चर्य हे श्रीमान शरद पवारांचे. महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. आता शरद पवारांचे म्हणणे असे की, तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल; पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा

पक्ष फोडून

भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. लोकमान्यांनी सांगितले आहे, “समाजाचा पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा आणि स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी लागत असते.’’ ते आज आठवते. श्री. शरद पवार हे ‘मऱ्हाटे’ आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात. तेव्हा त्यांच्याकडून वेगळय़ाच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे. देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय व त्या लढय़ासाठी ‘इंडिया’ ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. श्री. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत. मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकूमशाही वृत्तीचे विधेयक आणणारे श्री. मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील व श्री. शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी श्री. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळय़ा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदी हे तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि अराजकावर काहीच बोलायला तयार नाहीत. मणिपुरात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान मौनात आहेत. देशाच्या नायकाने संकटकाळी मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात 93 वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील. अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. नेते मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात. देवा, दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा! पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी, गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन!