
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिंदे गटाचे सचिन अहिर यांची आज एकमताने निवड करण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या आवाहनानुसार विरोधकांकडून दाखल केलेला शिवसेनेचे ज. मो. अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
उपसभापती पदासाठी महायुतीकडून शिंदे गटाचे सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज. मो. अभ्यंकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली.यानंतर शिवसेना आमदार अॅड. अनिल परब व अनुमोदक अभिजित वंजारी यांनी सभागृहाची सर्वानुमते निवड व्हावी ही इच्छा विचारात घेऊन अभ्यंकर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले.सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विधान परिषदेतील सर्व सदस्यांनी अहीर यांचे अभिनंदन करत प्रथेप्रमाणे त्यांना उपसभापतीपदाच्या खुर्चीवर नेऊन बसविले आणि शुभेच्छा दिल्या.
अहिरांच्या बुलडोझरने अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला
अहिर यांचे निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करताना विधान परिषदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली. सचिन अहिर यांचा बुलडोझर असा चालला की अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, असा टोला या पदासाठी इच्छुक असणाऱ्या शिंदे गटाच्या नीलम गोऱहे यांना नाव न घेता लगावला.





























































