
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी १५ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या क्रिकेट कौशल्याचे कौतुक केले आहे. ‘खरोखरच खास’ अशा शब्दात गौरवोद्गार काढले आहेत आणि वैभवला कसोटी क्रिकेट खेळताना पाहणे आपल्याला नक्कीच आवडेल, असेही सचिन म्हणाला आहे. मात्र, त्याचवेळी ‘वैभवला या फॉरमॅटमध्ये खेळवण्यासाठी घाई केली जाऊ नये’, असेही त्याने स्पष्ट केले आहे. सूर्यवंशीने आयपीएल (IPL) २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याने २३७.३१ च्या थक्क करणाऱ्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा कुटल्या आहेत. त्याने ७२ षटकार ठोकले – जो एक जागतिक विक्रम आहे – आणि त्याच्या फलंदाजीच्या आक्रमक शैलीमुळे तो चाहत्यांसह क्रिकेट तज्ज्ञांचाही आवडता खेळाडू बनला आहे. ‘प्रत्येकजण सूर्यवंशीबद्दल बोलत आहे, आणि मी त्याला फलंदाजी करताना पाहिले – त्याचा खेळ खरोखरच अप्रतिम होता’, असे तेंडुलकर याने ESPNCricinfo सोबत बोलताना सांगितले आहे.
‘माझे मत असे आहे की तो खरोखरच अगदी खास आहे. आणि केवळ चेंडू टोलवण्याची त्याची क्षमताच नाही, तर खेळताना तो ज्याप्रमाणे मनगटाचा वापर करतो त्यामुळे त्याने मला अधिक आकर्षित केले आहे. मैदानाच्या चारही बाजूंना फटके खेळण्यासाठी तुम्ही मनगटाचा वापर चांगला करणे आवश्यक असते आणि केवळ बॅट फिरवून काही उपयोग नाही. तो इतर खेळाडूंच्या तुलनेत चेंडूची लाईन आणि लेंथ खूप आधी ओळखतो आणि सहजतेने चेंडू सीमारेषा पार करतो’, असे सचिन म्हणाला
सूर्यवंशीच्या या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला हिंदुस्थानच्या क्रिकेट संघात सहभागी करून घेण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही नुकतेच या विचाराचे समर्थन केले असून वैभव ‘पूर्णपणे तयार’ असल्याचे म्हटले आहे.
सचिन या मुद्द्याशी सहमत आहे, तरी त्याने अधोरेखित केले की वैभवला स्वतःच्या शैलीने क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
‘मी त्याला फक्त स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्यास सांगेन’, असे सचिन म्हणाला. ‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. कसोटी क्रिकेटमध्ये वयासोबतच तो वेगवेगळ्या आव्हानांचा सामना कसा करायचा हे शिकेल. कुठल्या परिस्थितीवर उपाय शोधणारी मानसिकता असणे. अडचणी नेहमीच असणार आहेत. तुमच्या करिअरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि तुम्ही खेळत असलेल्या शेवटच्या चेंडूपर्यंत अडचणी राहतीलच. गोलंदाज प्रत्येक चेंडूवर तुम्हाला एक प्रश्न विचारत असतो. आता, तुम्ही त्यावर काय उपाय शोधता? हे महत्त्वाचे आहे. वैभव असा खेळाडू आहे जो खूप आत्मविश्वासी दिसतो, त्याला नक्की काय करायचे आहे याबद्दल तो पूर्णपणे स्पष्ट आहे आणि मला त्याच्या नैसर्गिक खेळाशी छेडछाड करायला आवडणार नाही.’
‘तो ज्या पद्धतीने चेंडू पाहतो आणि ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देतो, जर त्या प्रक्रियेत अडथळा आला – म्हणजे तुम्ही त्याला अनेक गोष्टी सांगून मध्येच खूप अडथळे निर्माण केले – तर तिथे खरे आव्हान उभे राहील. मी त्याला मैदानात जाऊन आपल्या पद्धतीने फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य देईन. वेळेसोबतच तो खेळातील इतर आव्हानांचा सामना करायला शिकेल’, असा विश्वास सचिनने व्यक्त केला.
‘केवळ मीच नाही, तर प्रत्येकालाच त्याला कधीतरी या फॉरमॅटमध्ये (कसोटी क्रिकेटमध्ये) पाहण्याची इच्छा असेल. ते कधी प्रत्यक्षात येणार हे मला माहित नाही. पण अशा एका उत्कंठावर्धक प्रतिभेला प्रोत्साहनाची गरज असते. आणि जर तो चांगली कामगिरी करत असेल, तर आपण त्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्याच्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे. त्याच्यावर सतत दबाव टाकता कामा नये, जसे की त्याने हे खेळले पाहिजे किंवा त्याने हे करायला नको होते, किंवा त्याची अमूक एका संघात निवड झाली पाहिजे. हे काम त्या लोकांसाठी (निवडकर्त्यांसाठी) सोडून द्या जे त्यासाठी जबाबदार आहेत’, असा मोलाचा सल्ला देखील त्यांने दिला.





























































