
सातारा जिह्यातील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 3 जागांवर यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 14, तर भाजपला 4 जागांवर विजय मिळाला. यामुळे जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 5, शिवसेना 3, भाजप 4 असे बलाबल झाले आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेल, तर भाजपने शेतकरी विकास पॅनेल उभे होते. त्यामुळे दोन्ही पॅनलमधील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या निकालाकडे जिह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 17 जागा जिंकत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रमसिंह सावंत यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. जतमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना धक्का मानला जात आहे. मजूर संस्था आणि बँका पतसंस्था गटांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा झटका बसला.
साताऱ्यात दिग्गजांना पराभवाचा धक्का
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने 21 पैकी 17 जागा जिंकून बँकेवर वर्चस्व राखले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखर गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 11 जण यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये सहा जागा राष्ट्रवादीप्रणीत सहकार पॅनलला मिळाल्या, तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली.
शिंदे समर्थकांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक
आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केवळ त्यांच्याच नव्हे, तर त्यांच्या समर्थकांच्याही जिव्हारी लागला. त्यामुळे निकालानंतर याचे पडसाद उमटले. शिंदे समर्थकांनी आक्रमक होत सातारा येथे राष्ट्रवादी भवनवर दगडफेक केली. आमदार शिंदे यांच्याबाबतीत पक्षातीलच काही लोकांनी दगाफटका केल्याचे शिंदे समर्थकांचे म्हणणे असून, त्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, आमदार शिंदे यांनी या प्रकाराबद्दल पत्रकारांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात ही कृती केल्याचे सांगत, ‘मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, स्वतः खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी असा प्रकार करू नये’, असे आवाहन त्यांनी केले.
साताऱ्यात गड आला, पण सिंह गेला
जावली सोसायटी मतदारसंघातील संघर्षमय ठरलेल्या लढतीत केवळ एका मताने आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का ठरला. सातारा जिल्हा बँकेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचीच सत्ता आली; पण पक्षाच्या स्थापनेपासून जिह्यात पक्षवाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्याच्या वाटय़ाला पराभव आल्यामुळे राष्ट्रवादीसाठी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे झाले आहे.
































































