वसंतवेली – आदर्शवत, नि:स्पृह नायिका

>> संजय कुळकर्णी

तरुण पिढीला उषा किरण म्हणजे तन्वी आझमीची आई एवढीच माहिती आहे. अतिशय स्पष्टवक्त्या, निस्पृह आणि बोलताना स्वतच्या आयुष्याची पानं उलगडणाऱया खूप वरच्या दर्जाच्या अभिनेत्री होत्या. अभिनेत्री म्हणून त्या अतिशय यशस्वी होत्या तरी त्यांना त्यांच्यातल्या आईपणाचा पराभव वाटत होता.

मराठी चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणा की भाग्य म्हणा, ते हे की, आपली नायिका ही हिंदी चित्रपटातील नायिकांसारखी गुलुगुलु बोलणारी, झाडामागे धावणारी मराठी चित्रपटांनी पसंत केली नाही. आपल्या नायिकांना मिळालेल्या लता मंगेशकर, आशा भोसले आणि माणिक वर्मा या गायिकांच्या श्रवणीय स्वरांमुळे त्या त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा हिट झाल्या.ज्या नायिका रसिकांच्या मनात घर करून आहेत आणि स्त्रीच्या म्हणून ज्या विविध भूमिका आहेत, नातेसंबंध आपल्या मनामध्ये असतात, मग ते मातृत्व असेल, भगिनी असणं असेल, त्याचे आदर्श काय याला आपल्या संस्कृतींनी दिलेले मापदंड आहेतच, पण त्याचबरोबर त्याला दिलेला वेगळा आयाम मराठी चित्रपटांनी घालून दिलेला आहे. कधी तो आदर्शवत वाटावा असा आहे. तो वास्तवाला धरून नसेल? असा प्रश्न मनात येऊ शकतो. कदाचित तो अतिरंजित असेलही असं जेव्हा समीरा गुजर बोलून गेल्या तेव्हा ‘मोलकरीण’मधील ‘देव जरी मज कधी भेटला’ या गाण्याची आठवण झाली.
मंगला खाडिलकर म्हणाल्या, या गाण्यातच एक नायिका आपण आपोआप उभी केली. वेळप्रसंगी त्याच्याकडे मोलकरीण म्हणून काम करते, पण शेवटी त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होते. ते संस्कार तिनं केलेले आहेत याबद्दल तिला विश्वास आहे. हे गाणं ऐकल्यावर ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत त्याच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे, असं वाटतं. सुलोचनादीदींचा हा चित्रपट नक्कीच रसिकांच्या मनात घर करून बसला आहे.

‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱयाला’ ही लावणी म्हणजे ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण होतं. या लावणीचं जवळ जवळ तीन दिवस चित्रण चाललं. जयश्री गडकर या आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या चतुरस्र अभिनेत्रीनं या ढंगदार लावणीत आपल्या नृत्य कौशल्यानं गहिरा रंग भरून रुपेरी पडद्यावर ती सजीव केली. या स्वप्नसुंदरीने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मंगला खाडिलकर जयश्री गडकर यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाची आठवण काढताना म्हणाल्या, जयश्रीबाईंची ‘हाय’ ही लावणी म्हणण्याची अदा आजही ती लावणी लागली की, आपल्या डोळ्यासमोर येते. ती अदा आणि लावणी नृत्य त्यांना लीला गांधी यांनी शिकविले. अनंत माने जयश्रीबाईंना म्हणाले की, मला हीच अदा पाहिजे. ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट 131 आठवडे तुफान चालला.

सुलोचनादीदींनी पडद्यावर लावणी साकार करणं म्हणजे एक धक्काच होता. ‘भाऊबीज’ हा चित्रपट यूटय़ूबवर अवश्य पहायला हवा. मंगला खाडिलकर त्याची आठवण सांगताना म्हणाल्या, सुलोचनादीदींची त्या चित्रपटातील अदा म्हणजे ग्रेटच! पाहतच राहावी अशी आहे. लोकांना मात्र ते आवडलं नव्हतं. ते त्यावेळी म्हणाले होते की, आमी तुमाला आयाबहिनीप्रमाने मानतो. तुम्ही असं बोर्डावर जाऊन नाचावं, पटत नाय. पुन्यांदा अशी कामं करायची नाहीत. आता बोला!

लिहिता लिहिता, ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’ या गाण्याची आठवण आली. उषा किरण या अभिनेत्रीवर ‘कन्यादान’ चित्रपटात चित्रित केले गेले होते. तसेच ‘प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला’ हे गाणंसुद्धा गाजलेले. उषा किरण या मूळच्या वसईच्या सिंधू मराठे. वसईशी त्यांचं नातं आहे. मंगला खाडिलकरसुद्धा मूळच्या वसईच्या. त्याबद्दल त्या म्हणाल्या, तरुण पिढीला उषा किरण म्हणजे तन्वी आझमीची आई एवढंच माहिती आहे. एवढीच तिची ओळख आहे, पण उषा किरण यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ‘कन्यादान’ चित्रपटातील त्यांची भूमिका आपण विसरू शकतच नाही. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. अतिशय स्पष्टवक्त्या, निस्पृह आणि बोलताना स्वतच्या आयुष्याची पानं उलगडणाऱया खूप वरच्या दर्जाच्या त्या होत्या. हिंदी चित्रपटात बिझी असल्यामुळे मनात असूनसुद्धा त्यांना घरी वेळ देता येत नव्हता. हिंदी – मराठी चित्रपटाचे शूटिंग दिवसभर असायचं. त्या मला एका मुलाखतीत म्हणाल्या की, माझी मुलगी वाढत होती, मोठी होत होती. मला अशा वेळी नेहमी वाटायचं की, मुलीची आई म्हणून तिच्या जीवनातील काही अवघड आणि कोमल अशा प्रसंगी मी असलं पाहिजे, पण माझं शूटिंग असायचं. माझ्या आईचं मन तळमळत असायचं. ज्यावेळी माझ्या मुलीनं दुसऱया धर्माचा जोडीदार स्वीकारायचा निर्णय घेतला त्यावेळी मला ‘आई’ म्हणून जाणवलं की, तिला काही उत्तरं हवी असतील. तिला त्यावेळी एकटेपण जाणवलं असेल. त्यावेळी तिच्या सोबत तिची आई म्हणून नव्हती. अभिनेत्री म्हणून मी अतिशय यशस्वी झाले असले तरी मला हा माझ्या आईपणाचा पराभव वाटतो. त्या बोलल्या आणि त्यांचे डोळे भरून आले. मी पण गहिवरले. ही व्यथा प्रत्येक स्त्राrची असते. घराचा उंबरठा ओलांडणाऱया महत्त्वाकांशी स्त्रीची असते.

उषा किरण या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या.त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांना आणि त्यांच्या मोठय़ा भगिनी लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना नाटकात कामं करण्यासाठी पाठवायचे ठरविले. घरासाठी आणखी उत्पन्नाचे एक साधन हा विचारही त्यामागे होता. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यांनी नृत्याचे शिक्षणसुद्धा उदय शंकर यांच्याकडून घेतले. तसेच बंगाली, गुजराती, तामीळ , इंग्रजी आणि हिंदी या भाषेवर प्रभुत्व मिळविले.

पुण्यात आल्यावर सीता स्वयंवर हा सिनेमा मिळाला. भूमिका जरी छोटी असली तरी त्याचे कौतुक झालें. ‘मायाबाजार’ या चित्रपटात रुख्मिणी ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यांचा मराठी चित्रपटात जम बसू लागला. विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ हा चित्रपट गाजला आणि त्यांना प्रमुख भूमिकांसाठी मागण्या येऊ लागल्या. 1950 मध्ये ‘श्रीकृष्ण दर्शन’ या चित्रपटात काम करत असतानाच स्वतचे ‘उषा मराठे’ हे नाव बदलून त्यांनी ते ‘उषाकिरण’ असे केले. या नावाने त्यांचे भाग्य उजळले आणि त्या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाल्या. 28 हून अधिक मराठी चित्रपटात भूमिका करताना आपलं नाव झळकत ठेवलं. हिंदी चित्रपटसृष्टीत बलराज सहानी, देवआनंद, दिलीपकुमार आणि राज कपूर अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करून आपली प्रतिमा तयार केली. बॉलिवूडमधील त्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी स्वतला सामाजिक क्षेत्रात वाहून घेतले. मुंबईच्या शेरीफ होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

[email protected]