
चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन जारी करत उद्योगमंत्र्यांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. उद्योग खाते राज्यातील टॉप पाच भ्रष्टाचारी खात्यांपैकी एक असल्याची टीका संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
संजय राऊत म्हणाले, राज्यातील पाच टॉप भ्रष्टाचारी खात्यांपैकी उद्योग खाते एक आहे. उद्योगमंत्र्यांनी महाराष्ट्रात कोणता नवीन उद्योग आणला? उलट साडे पाच हजार उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केले? याला लेखाजोखा त्यांनी कधी दिलाय का? एमआयडीसीच्या जमिनी विकणे, व्यवहार करणे आणि मोठ्या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडून खंडण्या उकळणे हे मिंधे गटाच्या अर्धे सरकारचे काम आहे.
चाकणची एमआयडीसी ही शरद पवार यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. ऑटोमोबाईल हब आपण त्याला म्हणतो. अनेक जागतिक स्तरावरच्या मोटार कंपन्या तिथे आल्या. लाखोंच्या प्रमाणात रोजगार मिळाला, व्यवसाय वाढले. आज तिथे कोणत्याही पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील तर त्याची जबाबदारी सगळ्यात आधी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. उद्योगमंत्री नंतर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात आधी आहे. गुंतवणूक आली, प्रगतीपथावर आहोत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी ते करतात. पण काय करत आहेत ते? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मोदी-शहा लोकलज्जेखातर 20 दिवसांनी संसदेत आले अन् मुखदर्शन देऊन पळून गेले; संजय राऊत यांचा घणाघात
ते पुढे म्हणाले की, गडचिरोली सारख्या ठिकाणी खाण उद्योजकांनी जो उच्छाद मांडलेला आहे तो सुद्धा उद्योग खात्याच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येतो. खाण उद्योगाच्या ट्रक किंवा वाहनांखाली तिथे 1500 लोक ठार झालेले आहेत. काय करत आहेत मुख्यमंत्री?
तसेच उद्योग खाते, सामाजिक न्याय ही सगळी खाते भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. ही सर्व खाती उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आहेत. मिंध्यांचे जे अर्धे सरकार आहे त्यांची ही खाती आहेत. उद्योग, सामाजिक न्याय, नगरविकास, रस्ते सगळीच…. हे अर्धे सरकारच बरखास्त केले पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.































































