2024ला तुम्ही सत्तेवर येत नाहीत, ही आमची गॅरंटी; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची मंगळवारी नागपूरमध्ये सांगता होत आहे. या सांगता सभेवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. 2024ला तुम्ही सत्तेवर येत नाहीत, ही आमची गॅरंटी आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा मंगळवारी नागपूर येथे धडकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः या सांगता सभेत सहभागी होत आहेत. तत्पूर्वी झालेल्या भाषणात संजय राऊत यांनी मिंधे-फडणवीस सरकार हे एक फुल आणि दोन डाऊटफुलचं सरकार असल्याचं टीका केली. संजय राऊत म्हणाले की, ही मर्दांची सभा आहे. लढणाऱ्यांची आणि संघर्ष करणाऱ्यांची सभा आहे. ही पळपुट्यांची सभा नाही. आम्ही लढू, संघर्ष करू आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणू. दिग्विजय सिंग येताना विजयाची वार्ता आणतील असं वाटलं होतं. पण दुर्दैवाने आम्हाला मध्य प्रदेशाची हवा कळली नाही. पण ती हवा या महाराष्ट्राला लागणार नाही. हे तुमचे नरेंद्र मोदी, देशभरात गॅरंटी द्यायला फिरतात. पण ही सभा मोदींना गॅरंटी देतेय की 2024ला तुम्ही सत्तेवर येत नाही. ही आमची गॅरंटी. 2024ला फडणवीस तुम्ही सत्तेत नसाल ही आमची गॅरंटी आहे, अशा शब्दांत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मघाशी अमोल कोल्हे म्हणाले की एक फुल दोन हाफ. तसं नाहीये. हे एक फुल आणि दोन डाउटफुल आहेत. यांच्यात फुल कोणीच नाही. याच्यात जर फुल कोण असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे. या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला क्रांती करायची आहे. आमची संघर्ष करण्याची तयारी आहे. अनिल देशमुखही इथे बसले आहेत. ते आमचे जेलमधले मित्र आहेत. जेलमधली मैत्री पक्की असते, संघर्ष करणाऱ्यांची मैत्री पक्की असते. आम्ही झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही. या अंगावर.. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि मी शरद पवारांचाही चेला आहे. याला म्हणतात डबल इंजिन, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.