
शिवसेनेचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची आज रात्री अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. सध्या ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पोलीस व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ”ठाण्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकत नसाल तर फडणवीसांची नोंद लज्जास्पद गृहमंत्री होईल”, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. तसेच पूर्णेकर यांच्या हत्येमागे मिनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंबीय व त्यांनी पोसलेले गुंड जबाबदार आहेत”, असा आरोप देखील त्यांनी केला.
”काय करतंय गृहखातं, काय करतायत ठाण्याचे पोलीस आयुक्त, ते घरगडी आहेत का मंत्र्यांचे, ठाण्यामध्ये गृहखात्याची रेंज पोहचत नाही. पूर्णेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मिनाक्षी शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती व फार थोड्या मतांनी त्यांचा परभाव झाला. त्यांच्यासोबत पूर्णेकरांचा शेवटपर्यंत राजकीय संघर्ष सुरू होता. मनोरमा भागात मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबीच्या माध्यमातून लोकांना बेघर करण्याचं काम सुरू आहे. तिथे बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. त्यांच्या क्लस्टरच्या विषयावर पूर्णेकर लढत होते. त्या भागाचा ताबा ड्रग्ज डिलर्सने घेतला होता. त्याविरोधात पूर्णेकर लढत होते. पोलिसांकडे तक्रारी करत होते. ते सामाजिक भान ठेवून काम करत होते. अमली पदार्थांविरोधात, सामान्यांना बेघर करणाऱ्या बिल्डर लॉबी विरोधात, निवडणूकीत घोटाळा करून जिंकणाऱ्या मिनाक्षी शिंदे सारक्या लोकांविरोधात लढत होते. त्यांच्या आवाज जेव्हा लोकांपर्यंत पोहचू लागला तेव्हा त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली याची लाज महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटायला पाहिजे. पण ही मोदी शहाची पिलावळ असल्यमळे त्यांना लाज वाटणार नाही. त्यांना माझी भाषा झोंबेल पण पूर्णेकरांच्या घरातील आकांत जाऊन बघा. लाज वाटत नाही का सरकारला. इतकं निर्ढावलेलं सरकार झालंय”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
यावेळी संजय राऊत यांनी ठाणे पोलिसांवर देखील जोरदार टीका केली. ”पोलीस आयुक्तांना ताबडतोब तिथून काढायला हवं. हे ठाण्याचे पोलीस १२ १२ वर्ष तिथे बसलेयत. कुणाच्या आशिर्वादाने बसलेयत? आयुक्त हे पालकमंत्र्यांचा घरगडी आहे, भांडी घासतायत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. गृहमंत्र्यांची संवेदना जर जागी असेल तर त्यांनी ताबडतोब याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गोळी मारणाऱ्यांच्या मागचे खरे गुन्हेगार जे शिंदे गटात आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे. पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्र्यांच्या नकाशावर ठाणे जिल्हा येत नाही. एकेकाळी ठाणे नयनरम्य, सुंदर, शांत शहर म्हणून प्रसिद्ध होतं. साहित्यिक, कवींचं शहर होतं. आज ते गुंडाचं, अंमंली पदार्थांचा तस्करी करणाऱ्यांचं, झोपडपट्टी दादांचं शहर झालं आहे. हे दुर्दैव आहे. कुठे आहेत या शहराचे पोलीस आयुक्त, त्यांना आदेश घ्यावा लागतोय का नंदनवन मधून? असा सवाल संजय राऊत यांनी केला.




























































