
सीआरझेडच्या मुद्दय़ावरून साई रिसॉर्ट प्रकरणात भाजपचे किरीट सोमय्या सातत्याने शिवसेना आमदार व माजी मंत्री अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करत आहेत. साई रिसॉर्ट हॉटेलवर हातोडा पडणार, असा दावा करत सोमय्या भलामोठा हातोडा घेऊन आज दापोलीत पोहचले, पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे कोणतेही आदेश नसल्याचे स्पष्ट करत सोमय्यांची नौटंकी उघड केली. ‘सी कॉच हॉटेल’ पाडण्याचे आदेश असताना साई रिसॉर्टच्या नावाने केलेला बनाव उघडकीस येताच त्यांनी मुरुड येथून काढता पाय घेतला.
साई रिसॉर्टवर हातोडा पडणार अशी आवई उठवत भाजपचे किरीट सोमय्या मंगळवारी पहाटे दापोलीत दाखल झाले. पोलीस ठाण्यामध्ये भेट देऊन लवकरच अनिल परब यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल होणार आणि आजपासून त्यांचे हॉटेल पाडायला सुरुवात करणार अशी घोषणा त्यांनी पत्रकारांसमोर केली आणि सोमय्या थेट मुरुडच्या दिशेने रवाना झाले. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट या ठिकाणी आल्यानंतर 30 दिवसांत हॉटेल पाडणार असा दावा करत प्रतीकात्मक हातोडय़ाचे घाव जमिनीवर घालायला सुरुवात केली; परंतु उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी साई रिसॉर्टला कोणत्याही प्रकारे अद्याप धोका नाही. ते पाडण्याचे आदेश आलेले नाहीत. सी कॉच हॉटेलचे बांधकाम पाडण्याचे आदेश असल्याचे सांगत सोमय्यांच्या दाव्याची पोलखोल केली.
हातोडा दौरा फुसका
साई रिसॉर्ट हॉटेल पाडणार होतात मग सी कॉच हॉटेलवरच हातोडा का? आणि साई रिसॉर्ट हॉटेलला कोर्टाकडून स्टे आला असता तो पाडण्यात कसा येणार? असा प्रश्न विचारला असता सोमय्या यांनी पत्रकारांना चुकीची माहिती मिळाली आहे. मी दोन्ही हॉटेलच्या सामायिक अंगणामध्ये हातोडा घातलाय. एक हॉटेल तुटायला सुरुवात झाली, दुसरेही तुटेल असे म्हणत हातोडा दौरा फुसका ठरल्याने सोमय्यांनी पळ काढला.
हॉटेल व्यावसायिकांत भीतीचे वातावरण
मुरुड येथील कथित साई रिसॉर्टचे बांधकाम हे सीआरझेडचे उल्लंघन करणारे असल्याचे सोमय्या म्हणत असतील तर दापोली तालुक्यातील अगदी केळशी ते दाभोळपर्यंतच्या साधारण 35 किमी अंतरावरील समुद्रकिनारपट्टीवरील जवळपास सर्वच हॉटेल ही सीआरझेडचे उल्लंघन म्हणून तुटली जातील असे भीतीचे वातावरण हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने येथील रोजगार गमावण्याची आणि पर्यटन व्यवसाय समूळ नष्ट होण्याची भीती ही स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सोमय्यांविरुद्ध फौजदारी दावा करणार
साई रिसॉर्ट प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने माझी बदनामी करत आहेत. मी सोमय्यांविरोधात यापूर्वी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, मात्र आता मी फौजदारी दावादेखील दाखल करणार आहे. मी क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले.
सोमय्यांना त्यांच्या पक्षात कुणीही विचारत नसल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिसी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजून सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावून बदनामी करत आहेत. तपास यंत्रणांना माझा विरोध नाही. त्यांना हवी ती सर्व माहिती मी दिलेली आहे. यापुढेही तपासात सहकार्य करू, असे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.






























































