माझी साथ सोडणाऱ्यांना निवडणुकीनंतर तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल! शरद पवार यांचा सूचक इशारा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसची साथ सोडून आज काही जण भाजपसोबत गेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील घराच्या एका भागात ईडीने कार्यालय थाटले आहे. पण माझी साथ सोडणाऱयांना निवडणूक संपल्यावर पुन्हा या तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडखोरीच्या मुद्दय़ावरून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना थेट लक्ष केले. प्रफुल्ल पटेल यांचे प्रकरण तुम्हाला माहिती असेल. ते मुंबईच्या वरळी भागात राहतात. त्यांचे घर सुंदर आहे. पण ईडीने त्यांच्या घराच्या बहुतांश भागाचा ताबा घेऊन तिथे आपले कार्यालय थाटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर झाल्यामुळेच हे नेते भाजपसोबत गेले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले. माझ्या कुटुंबातील काही जणांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असे शरद पवार म्हणाले.

भाजपसोबत गेलेल्या नेत्यांपैकी काही जण मला भेटले. त्यांना कोणत्या परिस्थितीत हा निर्णय घ्यावा लागला हे त्यांनी मला सांगितले. सीबीआय व ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर त्यांच्याविरोधात केला जात आहे. त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, अशी अडचण त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली. पण भाजपसोबत जाण्याचा माझा विचार नव्हता आणि आजही नाही. त्यामुळे त्यांना मला सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपसोबत जाण्याचा माझा विचार नव्हता आणि आजही नाही. माझ्या या ठाम भूमिकेमुळेच काहींची अडचण झाली व त्यांनी मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला.