होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे कारण…तुमच्या राजवटीत शेतकरी दु:खी आहे महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती, अस्वस्थ आत्मा म्हणत केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सणसणीत प्रत्युत्तर दिले. ‘होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरे आहे, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱयांचे दुखणे बघून अस्वस्थ आहे. तुमच्या राजवटीत आज देशात महागाई वाढली आहे, लोकांना संसार करणे कठीण झाले आहे. त्यासाठी मी एकदा काय शंभर वेळा अस्वस्थ होईन, त्यात गैर काय, अशा शब्दांत पवार यांनी मोदींना सुनावले.

महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे. तो अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करत आहे. तो आत्मा सरकार अडचणीत आणतो, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये शरद पवार यांनी मोदींच्या त्या टीकेचा समाचार घेतला. सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, असे संस्कार यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केले आहेत आणि त्या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार यांनी यावेळी निक्षून सांगितले.

मोदी हुकूमशाहीच्या दिशेने चाललेत

ईडीचा एक टक्काही वापर करत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले, पण जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांनाच मोदी तुरुंगात टाकतात. एक टक्का म्हणोत किंवा आणखी काही, पण मोदी हुकूमशाहीच्या दिशेने जात आहेत, हे निश्चित असेही शरद पवार म्हणाले.

…तर देशाची भुताटकी आणि स्मशान होईल

मोदी यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही समाचार घेतला. ‘अतृप्त आत्मा पंतप्रधानपदी पुन्हा बसली तर देशाची भुताटकी आणि स्मशान होईल,’ असे संजय राऊत यांनी फटकारले. ‘‘इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी एकापेक्षा जास्त चेहरे आहेत, हे लोकशाहीसाठी चांगले आणि उत्तम आहे. लोक स्वीकारतील तो पंतप्रधान बनेल. भाजपसारखा आम्ही पंतप्रधान देशावर लादणार नाही,’’ असे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, मी मोदींना विचारतो!

‘‘मोदींनी ‘भटकती आत्मा’ कोणाला म्हटले मला माहीत नाही. ते कळायला मी ज्योतिषी नाही. पण यानंतरच्या सभेत मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना विचारेन की भटकती आत्मा कोणाला म्हटले आणि त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता?’’ अशी सावध प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मोदीच खरे भटकती आत्मा

मोदीच खरे भटकती आत्मा आहेत. दहा वर्षे ते फक्त प्रचारच करत आहेत. जगभर भटकत आहेत. दिवसभर कपडे बदलून कधी समुद्राच्या खाली तर कधी हवेत फिरत असतात. असा पंतप्रधान झाला नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गुजरातचा अतृप्त आत्मा वणवण भटकतोय

होय, शरद पवार महाराष्ट्राचा आत्माच आहेत. जनतेच्या मनात असणाऱया या आत्म्याने गुजरातच्या एका अतृप्त आत्म्यावर महाराष्ट्रात भरउन्हात वणवण भटकण्याची वेळ आणली आहे, असा टोला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी हाणला.

पह्डापह्डीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही

भाजपने आमचे घर पह्डले, पक्ष पह्डला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना पह्डले. हे पह्डापह्डीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, पण भाजप अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर करतेय, अशी टीका पवार यांनी केली.