शिर्डी साईबाबा रूग्णालयात कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिर्डी

शिर्डी साईबाबा रूग्णालयात संस्थान कर्मचाऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर हलगर्जी पणा केल्याचा आरोप करत रूग्णाच्या नातेवाईक व संस्थान कर्मचाऱ्यांनी पाच तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे रूग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. संस्थानच्या वतीने या प्रकाराची चौकशी करून मयताच्या पत्नीला कामावर घेण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.

पोपट फकिरा गोसावी या साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान 5 डिसेंबर बुधवारी राजी सायंकाळी मृत्यू झाला .
सदर मृत्यू हा डॉक्टरच्या हलगर्जीपणा मुळे झाला असा आरोप मयत पोपट गोसावी यांचे नातेवाईक व संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी केला. त्यानंतर गुरुवारी 400 कामगारांनी एकत्र येत साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या परिसरात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे 5 तास तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने साई संस्थान प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

28 नोव्हेंबर 2018 रोजी मयत पोपट गोसावी हे वाळकी, ता.राहाता येथून मोटारसायकल वरून संस्थान मध्ये ड्युटीला जात असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने पडले, त्यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. वैद्यकीय संचालक डॉ नारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ नंदकुमार हे पोपट गोसावी यांच्यावर उपचार करत होते, दरम्यान आम्हाला पेशंटवर नाशिक येथे उपचार करायचे आहे अशी मागणी मयत पोपट गोसावी यांच्या नातेवाईकांनी केली मात्र तुम्ही काळजी करू नका त्यांचेवर इथेच चांगले उपचार करू असे सांगत डॉक्टरांनी डिस्चार्ज करण्यास नकार दिला. परंतु पोपट गोसावी हे शुद्धीवर आलेच नाही आणि दुर्दैवाने 5 डिसेंबरला संध्याकाळी त्यांची प्राणजोत माळवली, पोपट गोसावी यांना पत्नी, 3 मुली व एक लहान मुलगा ,आणि वयोवृद्ध आई असा परिवार असून मोठ्या मुलीचे लग्नही जमले होते,या सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र दुर्दैवाने पोपट गोसावी यांचा मृत्यू झाला आणि सर्व कुटुंब पोरके झाले.

ही घटना दुर्दवी असून त्याला संस्थानचे डॉ जबाबदार असल्याचा आरोप करत मयताच्या नातेवाईकांसह, संस्थान कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण होते.

यावेळी पोलीस उप अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा बोलावून सदर आंदोलन थांबविण्यास विनंती केली. मात्र मयत पोपट गोसावी यांच्या पत्नीस लगेच कायमस्वरूपी कामावर घ्यावे व दोन डॉक्टरांना सेवेतून निलंबित करावे आशा मागणीचे पत्र देत जो पर्यन्त लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सर्व आंदोलकांनी घेतला होता. शेवटी सदर उपचार केल्याची फाईल वैदयकीय अधिकारी नगर येथे पाठविण्यात येईल व त्यांच्या अहवालानंतर आम्ही कारवाई करू आणि संस्थान नियमाप्रमाणे मयताच्या पत्नीस अनुकंपामधे समाविष्ट करू असे पोलीस उप अधीक्षक आनंद भोईटे यांनी विश्वासाने सांगितल्यावर तणाव मिटला आणि आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळी साई एम्प्लॉईज सोसायटी चे चेयरमन तुषार शेळके, संचालक विठ्ठल पवार उप नागरदयक्ष सुजित गोंदकर यांनी मयताच्या कुटुंबास आर्थिक मदत करण्याच आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.