
नव्या लोकल ट्रेनमधील सूचना फलकांवर मराठीचा वापर टाळून अपमान करणाऱ्या मध्य रेल्वेला गुरुवारी शिवसेनेने दणका दिला. रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त करीत शिवसैनिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मराठीचा अपमान खपवून घेणार नाही. लोकलच्या सूचना फलकांमध्ये तातडीने मराठी भाषेला प्राधान्याचे स्थान द्यावे, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना फलकांमध्ये आवश्यक तो बदल करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिवसेना उपनेते व रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर (बाबी) देव, विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाने गुरुवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि जाब विचारला. यावेळी महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर, विकास मयेकर, बाजीराव मालुसरे, संतोष घरत, विकास आडुळकर, अजिंक्य धात्रक, करुणा गीध, कल्पना सुर्वे, सुरेखा उबाळे, कल्पना भांबुरे, मीना आंधळे यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या सर्व सूचना फलकांमध्ये तत्काळ मराठी भाषेचा समावेश करुन चुका दुरुस्त्या कराव्यात. प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन केले जाईल आणि त्याला रेल्वे प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. त्यावर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना फलकांमध्ये मराठीला प्राधान्याचे स्थान देण्यासाठी आवश्यक तो बदल करण्याबाबत आश्वासन दिले.





























































