
मुंबईला आजही विजय पावला नाही. परिणामतः मुंबईवर असलेले ‘हारग्रहण’ सुटले नाही. क्विंटन डिकॉकच्या 112 धावांच्या झंझावाती खेळीने मुंबईला 196 धावा उभारून दिल्या, पण पंजाबच्या प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 139 धावांच्या भागीने मुंबईची अक्षरशः धुळधाण उडवली. पंजाबने विजयी लक्ष्य 21 चेंडू आधीच गाठत आयपीएलच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान काबीज केले. मुंबईच्या डावाला खिंडार पाडणारा अर्शदीप सिंग पंजाबच्या विजयाचा मानकरी ठरला.
मुंबईने उभारलेले 197 धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबची दमछाक उडेल आणि मुंबईकरांना आपल्या पराभवांची मालिका संपवण्यात यश मिळेल, या आशेने आज मुंबईकरांनी वानखेडे हाऊसफुल्ल केले होते. पण प्रभसिमरन सिंगने मुंबईचे स्वप्न धुळीस मिळवले. प्रियांश आर्य आणि कुपर कोनोली या दोघांचा अडसर अल्ला मोहम्मद गझनफरने दूर केला, पण त्याचा लाभ ना मुंबईचा एकही गोलंदाज उठवू शकला, ना प्रभसिमरन आणि अय्यरने तो उठवू दिला. या दोघांनी बुमरापासून पंडय़ापर्यंत मुंबईच्या साऱ्याच गोलंदाजांना फोडून काढत आपला विजय प्रारंभापासून निश्चित केला. या दोघांच्या शतकी भागीनंतर मुंबईच्या पराभवाचे ग्रहण आजही सुटणार नसल्याचे संकेत मिळाले आणि ते संकेत दोघांनी खरेही केले. अय्यरने 35 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकार खेचत 66 धावा वसूल केल्या. तो बाद झाल्यावर प्रभसिमरनने 17 व्या षटकात पंजाबच्या विजयी चौकारावर शिक्कामोर्तब केले. प्रभसिमरन 80 धावांवर नाबाद राहिला.
डिकॉकच्या शतकाचा आधार
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे डिकॉकला सलामीला उतरण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचे शतक केले. अर्शदीपने पहिल्या चेंडूवर रिकल्टनला बाद केले तर पुढच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवची अपयशाची मालिका कायम राखत त्याला भोपळाही फोडू दिला नाही. 2 बाद 12 नंतर मुंबईच्या डावाचे बारा वाजणार असे वाटत असताना डिकॉकने नमन धीरच्या साथीने तुफानी फलंदाजी केली. डिकॉकने आधी धीरबरोबर 122 धावांची घणाघाती भागी केली. धीरने 50 धावा ठोकल्या. त्यानंतर क्विंटनने षटकारबाजी कायम राखत नाबाद 112 धावा चोपल्या.





























































