बॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या खासदाराला यूएपीए कायद्याखाली अटक करा, शिवसेनेची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेतून फुटून शिंदे गटाच्या ‘गँग ऑफ गद्दार’मध्ये सामील झालेल्या खासदारांच्या विरोधात राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यामुळे बिथरलेल्या गद्दार खासदार संजय दिना पाटील यांनी ‘माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन,’ अशी खुलेआम धमकी देण्यास सुरुवात आहे. याची गंभीर दखल घेऊन बॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या खासदाराला यूएपीए कायद्याखाली अटक करा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

ठार केलेले 5 लोक कोण? याचा तपास करा

संजय पाटील म्हणतात, मी याआधी पाच लोकांना ठार केले आहे. ठार केलेले हे पाच लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले, त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद

संजय पाटील यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, असे संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.