
सांताक्रूझ पूर्व व आसपासच्या परिसरात सध्या लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत; पण तुलनेत पाणीपुरवठ्यात वाढ होत नाही. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात तातडीने वाढ करण्याची मागणी शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे विधानसभेत केली.
गेल्या वीस वर्षांपासून पालिकेच्या एच पूर्व विभागात दररोज 115 दशलक्ष लिटर्स व बीकेसी परिसरात दररोज 15 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढली. परिणामी दरवर्षी सरासरी 1400 नवीन जलजोडण्या दिल्या जातात. तसेच या विभागात पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पुनर्विकास योजना व इतर विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत; पण त्या तुलनेत पाणीपुरवठा न वाढल्याने अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर एच पूर्व विभाग व बीकेसी परिसरात पाण्याच्या गरजांचा सर्वंकष आढावा घेऊन पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी संजय पोतनीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.





























































