सामना ऑनलाईन । अयोध्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चलो अयोध्याचा नारा देऊन सर्व हिंदू बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. अयोध्येमधील वातावरण भगवे झाले असून सर्व हिंदू बांधव याठिकाणी एकवटत असल्याचे दिसत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी अयोध्येतील लक्ष्मण किला मैदान येथे होणाऱ्या आशीर्वाद कार्यक्रमाच्या आधी ‘मैथिली रमण श्रवण महंत’ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, सर्वाजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : अयोध्येत लक्ष्मण किला येथे भूमिपूजन
जगभरातील कोटय़वधी हिंदूंच्या आस्थेचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘चलो अयोध्या’चा नारा सर्व हिंदू बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे. हिंदुत्ववादी संघटनाच नव्हे तर अनेक धार्मिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही अयोध्येत जमू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन तेथील नागरिकांशी संवादही साधणार आहेत. त्या कार्यक्रमाला अयोध्येतील संतमहंतांबरोबरच स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अयोध्येला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. 24 नोव्हेंबरला दुपारी विमानाने फैजाबाद हवाईपट्टीवर उतरल्यानंतर तिथे त्यांचे भव्य स्वागत होईल. तेथून लक्ष्मण किला मैदानात आशीर्वाद समारंभ आणि संत पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यात उद्धव ठाकरे हे मुख्य यजमान असतील. त्यानंतर ते सायंकाळी शरयू आरती करतील. त्या आरतीच्या वेळी शरयू तीरावर हजारो हिंदू भाविक उपस्थित राहणार आहेत. 25 नोव्हेंबरच्या सकाळी उद्धव ठाकरे हे श्रीराम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधतील.




























































