
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन ठेवा’ असा अजब सल्ला देणारे भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आज संभाजीनगरात जोरदार आंदोलन केले. भाजपच्या मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे चारा नाही. भाजप आमचं पाव्हणं आहे. त्यामुळे आम्ही आमची जनावरे भाजपच्या कार्यालयावर घेऊन निघालो आहोत, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
राम शिंदेंच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन: पाहा फोटो
मात्र हे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यावेळी आम्हाला आमची बाजू मांडू द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. भाजपच्या मंत्र्यांनी केलेले विधान म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही ही जनावरे आता भाजपच्या कार्यालयात घेऊन चाललो आहोत. जनावरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन चिरडून टाकले.































































