भाजप, मिंधे आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाराष्ट्रात स्थान नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे डोंबिवलीमध्ये उपस्थित होते. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील राजकारण आणि भाजपला वाटत असणारी पराभवाची भीती यावर मत व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसेच महाराष्ट्रात भाजप, मिंधे गट आणि त्यांच्या मिक्षपक्षांना स्थान मिळणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

पक्ष, आमदार, खासदार फोडणे हे भाजप, महायुती आणि एनडीएतील घटकपक्ष असलेल्या ईडी आणि सीबीआयचे काम सुरूच असते. मात्र, महाविकास आघाडी सातत्याने महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलत आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आपण अनेकदा आव्हान दिले आहे. एकट्याने किंवा त्यांच्या खात्याला घेऊन बसावे आणि महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर का जात आहे. कृषीक्षेत्र अडचणीत का आहे, दोन वर्षांपासून राज्याचा विकास का झाला नाही यावर चर्चा करावी. मात्र, या मुद्द्यांवर चर्चा करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यामुळे काही चिंधीचोर आमच्याविरोधात बोलण्यासाठी पाठवत असतात. त्यामुळे अशा लोकांना आपण महत्त्व देत नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

आता भाजप धार्मिक मुद्द्यांवर बोलत आहे. जेव्हा जेव्हा भाजप मागे पडते, तेव्हा ते धार्मिक विषय आणि हिंदू-मुस्लिम वादाचा विषय आणायचा प्रयत्न करतात. असे मुद्दे उचलून विनाकारण धर्माधर्मात , जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र आहोत आणि महाराष्ट्र हिताचेच बोलत राहणार आहोत. आज जर महाराष्ट्र हिताचे बोललो नाही तर आपले मंत्रालयाही ते सूरतमध्ये नेऊन ठेवतील, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

कर्नाटकमध्ये रेवण्णा यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आले होते. ते अजूनही त्यांचा प्रचार करत आहे. या सर्व प्रकाराकडे निवडणूक आय़ोग फक्त बघत आहे. निवडणूक आयोग रेवण्णा यांचा उमेदवारी अर्ज बाद करणार आहे का, अशा गंभीर प्रकारातही निवडणूक आयोग फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे का,असे प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे देशात निवडणूक आयोग आहे का आणि भाजप रेवण्णा यांच्यावर काही कारवाई करणार आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात भटकती आत्मा असा उल्लेख केला. ते दुर्दैवी आहे, ज्या नेत्याने महाराष्ट्रात आणि देशात काम केले आहे. ते राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. वयानेही ज्येष्ठ असलेल्या अशा नेत्याबाबत नरेंद्र मोदी यांनी असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. आता राज्यात नकली शिवसेना, भटकती आत्मा अशी शिकवण ते महाराष्ट्राला देत आहेत का, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला, मिंधे गटाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला स्थान मिळणार नाही.