
अयोध्येच्या राम मंदिरातील लुटीविरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाचा दुसरा टप्पा शनिवार, 18 जुलैपासून सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिले आंदोलन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभू रामचंद्रांच्या नावाने राज्य करणाऱ्या भाजपच्या राजवटीतच राम मंदिरातील दानपेटीवर दरोडा पडला. चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर या प्रकरणात कारवाई झाली. अनेक जणांना अटक झाली. न्यासाच्या प्रमुखांना राजीनामे द्यावे लागले. या घडामोडींमुळे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येची आणि राम मंदिराची प्रचंड बदनामी झाली. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे.
18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित असतील. या आंदोलनात शिवसेना नेते, विदर्भातील शिवसैनिक व रामप्रेमी जनता मोठय़ा संख्येने सहभागी होईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
अयोध्येची लूट आजही सुरूच
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रामरक्षा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. ‘राम मंदिर लुटीच्या विरोधात देशात तीव्र असंतोष आहे. आजही मुख्य आरोपी पकडले गेलेले नाहीत. आजही लूट सुरू आहे. स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येत आहेत. त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केली आहे. त्याविरोधातच रामरक्षा आंदोलन आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली चौकशी व्हावी – आदित्य ठाकरे
‘मातोश्री’वरील पत्रकार परिषदेत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राम मंदिरातील चोरीच्या तपासाबाबत भूमिका मांडली. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखालीच या चोरीची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘भाजपने नियुक्त केलेल्या ट्रस्टींनी राम मंदिर लुटलंय. भाजप आमच्या आणि जनतेच्या भावनांशी खेळतोय. हिंदू हे कधीच विसरणार नाहीत,’ असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.




























































