शिवसेनेच्या कर्तबगार उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

शिवसेनाप्रमुखांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे सत्तेची पर्वा न करता शिवसेना नेहमीच जनतेच्या प्रश्नावर आक्रमक राहिली आहे. सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेने विश्वास संपादन केला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेने कर्तबगार आणि प्रामाणिक उमेदवार दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शिवसेना उमेदवारांना मोठय़ा फरकाने विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांनी केले. धुळे शहराच्या पूर्वेकडील वरखेडी येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी प्रचार फेरी निघाली.

धुळे शहराचा विस्तार झाल्याने बाळापूर, चितोड, अवधान, मोराणे, वरखेडी या गावांचा समावेश शहरात करण्यात आला आहे. पूर्वेकडील वरखेडी गावाचा समावेश महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील प्रभागांबरोबरच ग्रामीण क्षेत्र सलंग्न असलेल्या प्रभागांमधून शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पक्षाने प्रामाणिक आणि कर्तबगार उमेदवार दिले आहेत. समाजकारणाचा वसा घेत शिवसेनेने विश्वास संपादन केला आहे. भविष्यातही तो कायम राहील. त्यामुळे वरखेडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन नाईक यांनी केले.

वरखेडी येथे निघालेल्या प्रचार फेरीत जिल्हय़ाचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, देवराम माळी, प्रमोद चौधरी, उमेदवार चुडामण मोरे, मनीषा माळी, दीपाली चौधरी, गुलाब माळी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी म्हणाले की, प्रभाग क्रमांक 10 मध्ये वरखेडी गावाचा समावेश होतो. गेल्या 20 वर्षांपासून वरखेडी गावाची सत्ता शिवसेनेकडे आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांनाच वरखेडीतून प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास आहे. पक्षाचा आत्मविश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन हिलाल माळी यांनी केले.

प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
वरखेडी गावाचा समावेश असलेल्या प्रभाग 10 मध्ये शिवसेनेने चुडामण मोरे, मनीषा माळी, दीपाली चौधरी, गुलाब माळी यांना उमेदवार केले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांच्या नेतृत्वात प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील हनुमानाचे दर्शन घेऊन नारळ वाढविल्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात झाली. शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार केला. नव्याने शहरीकरणाची झालर प्राप्त होत असलेल्या वरखेडी गावाच्या विकासासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.