
अस्मानी व सुल्तानी संकटांनी बळीराजा पिचलेला आहे. त्याच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, 16 जून रोजी शेतकऱयांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी मराठवाडाव्यापी ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘नको अटी – नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती’ या घोषवाक्याखाली मंगळवारी सकाळी 10 वाजता मराठवाडय़ातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर प्रचंड ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली होणार आहे.
नैसर्गिक आणि राजकारणीनिर्मित संकटांमुळे राज्यातील शेतकरी सध्या मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा कमी भाव, बोगस खतांचा भडीमार, खऱयाखुऱया खतांचा तुटवडा, अपुरा वीजपुरवठा आणि विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱयांच्या सरसकट कर्जमुक्तीसासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या धडक ट्रॅक्टर रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.
या ट्रॅक्टर रॅलीमध्ये शिवसैनिक, पक्षाचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सुनील काटमोरे, परशुराम जाधव, रोहिदास चव्हाण, बबनराव थोरात, प्रदीपकुमार खोपडे, खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार कwलास पाटील, आमदार राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रणजीत पाटील, बालाजी रेड्डी, बबन बारसे, भुजंग पाटील, जोतिबा खराटे, संदेश देशमुख आणि गोपू पाटील यांनी केले आहे.
असे असेल आंदोलन
वार – मंगळवार
वेळ – सकाळी 10 वाजता
ठिकाण – सर्व जिल्हाधिकारी कार्यालये



























































