विरोधकांचे ‘डाव’ खोटे ठरणार; विजयाचे ढोलताशे शिवसेनाच वाजवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

जुमल्याविषयी बोलण्याचाही आता कंटाळा आला आहे. दोन कोटी रोजगार देणार यावर आता जनतेचा काडीमात्र विश्वास नाही. उलट नोटाबंदीमुळे ४० लाख लोकांचे रोजगार गेलेत, अशी घणाघाती टीका करतानाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत विरोधकांचे डाव खोटे ठरवून शिवसेनाच विजयाचा गुलाल उधळेल, असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाण्यातील रेमंड हॉल येथे पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, २०१९ मध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता महाराष्ट्रात येणार असून त्यासाठी विधानसभा व विधान परिषदेत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून जाणे आवश्यक आहे. कोकण पदवीधरची जागा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत जिंकणार असून ठाण्यातून मला आणखी एक आमदार हवा आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आजच्या  शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळे शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत कामे करीत आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर रोजगारासाठी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी तसेच बँपिंग व एव्हिएशन क्षेत्रात तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम शिवसेना करीत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळप्रकरणी शिवसेनेमुळे पुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला हे आपले मोठे यश आहे. शिवसैनिक पेटून उठला की काय होऊ शकते ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून दाखवून दिले आहे. मुंबई, कोकणसह चारही जागा शिवसेनाच जिंकणार असून २८ जूनला गुलाल उधळत तसेच ढोलताशे घेऊन शिवसेना भवनवर या, विजय आपलाच आहे, असे आमंत्रणच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे व उमेदवार संजय मोरे यांचेही भाषण झाले.

या मेळाव्यास खासदार राजन विचारे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, सुभाष भोईर, शांताराम मोरे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे आदी उपस्थित होते.