हिंदुस्थानच्याच पैशांवर पाकिस्तानचे क्रिकेट, रावळपिंडी एक्प्रेस पीसीबीवर धडकली

बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय आणि इतर बोर्डांकडून आयसीसीकडे येणारा पैसा महसूल वाटणीअंतर्गत पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (पीसीबी)ला पाठवला जातो. याच पैशांच्या जोरावर पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते, असे परखड मत ‘रावळपिंडी एक्प्रेस’ शोएब अख्तरने व्यक्त केलेय.

शोएब अख्तरने हिंदुस्थानातील एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत हे सनसनाटी, पण खरे मत व्यक्त करून पीसीबीला सत्याची जाणीव करून दिली. शोएब म्हणाला, बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत बोर्ड असल्याने त्यांच्याकडूनच सर्वाधिक महसूल आयसीसीला जातो. मग त्या महसुलातील वाटा पाकिस्तानलाही मिळतो. याच वाटय़ातून पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते. त्यामुळे 2023 च्या विश्वचषकात हिंदुस्थानने भरपूर कमाई करावी अशी माझी इच्छा आहे. आगामी विश्वचषक हिंदुस्थानात असल्याने हिंदुस्थानी संघावर सर्वात जास्त दबाव असेल. हिंदुस्थानातील मीडियामुळे टीम इंडियावर अधिक दबाव पडतो. त्यामुळे टीम इंडियाने दबावात न येता खेळ केला पाहिजे, असेही तो म्हणाला.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीबद्दल एक वक्तव्य केले आहे. मेलबर्नमध्ये झालेला हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा सामना पूर्णपणे विराट कोहलीचा होता. क्रिकेटच्या देवाची त्याच्यावर कृपा होती. तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. ‘देवाने एकप्रकारे त्याला सांगितले की, हे तुझे व्यासपीठ आहे. ये आणि पुन्हा क्रिकेटचा किंग हो. मला वाटतं की, विराट अजून किमान सहा वर्षे खेळेल आणि सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रमही मोडेल. विराट कोहलीकडे तो विक्रम मोडण्याची क्षमता आहे, असेही त्याने भाकीत वर्तवले.