विश्वचषक नेमबाजी स्पर्धा – हिंदुस्थानला मिश्र दुहेरीत दोन सुवर्ण पदके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चौथ्या दिवशी मिश्र दुहेरीत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. दिव्यांश सिंग व इलावेनिल वलारिवान आणि सौरभ तिवारी व मनु भाकर यांनी देशाला ही सुवर्णपदके जिंकून दिली. हिंदुस्थानने स्पर्धेत 5 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई केली.

दिव्यांश-इलावेनिल जोडीने 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदकांची कमाई केली. या जोडीने अंतिम लढतीत हंगेरीच्या जोडीचा 16-10 असा पराभव केला. दिव्यांशचे स्पर्धेतील हे दुसरे पदक होय. त्याने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

सौरभ-मनु जोडीने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध साधला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांनी इराणच्या जोडीवर 16-12 गुण फरकाने मात केली. याच गटात अभिषेक वर्मा व यशस्विनी देशवाल जोडीनेही कांस्यपदकाची कमाई करत हिंदुस्थानच्या झोळीत आणखी एक पदक टाकले.

मनोबल उंचावले – दिव्यांश

पदक जिंकल्यानंतर दिव्यांश सिंग म्हणाला, ‘मिश्र दुहेरीचा प्रकार मी खूप एन्जॉय करत असतो. या प्रकारात मानसिक दबाव थोडा कमी असतो. एखादा शॉट खराब लागला, तरी आपल्याला सावरण्यासाठी सहकारी असतो. मात्र, वैयक्तिक प्रकारात दबाव अधिक असतो. या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली, त्यावेळी मी नर्व्हस होतो. या विजेतेपदामुळे मनोबल उंचावले आहे, असे उद्गारही त्याने काढले.