छोटीशी गोष्ट : झाडं चालायची थांबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अश्विनी बर्वे

फार फार पूर्वी माणूस जगण्यासाठी जंगलात भटकत असे त्यावेळची ही गोष्ट. त्यावेळी झाडं आजच्यासारखी एका जागी स्थिर नव्हती. मग कशी होती, तर ती माणसासारखीच हिंडत फिरत असत.
‘‘अरे, इथे किती ऊन आहे! जरा माझ्यावर सावली धर बरं’’ असं माणसाने सांगितले की, लगेच एखादे झाड माणसाच्या जवळ येऊन उभे राही.

‘‘आज तुम्ही सगळे जण माझ्याबरोबर डोंगरावर चला, तिथं काहीसुद्धा खायला मिळत नाही. तुमची फळं खाऊन मी तिथं राहू शकेन’’ असं माणूस झाडांना म्हणायचा. मग लगेच झाडं माणसाचं ऐकत. जेव्हा कोणीही माणूस झाडाला हाक मारी, तेव्हा झाड त्याच्याकडे जाई आणि त्याला साथ देई. झाडाला माणसाचं म्हणणं आणि माणसाला झाडाचं म्हणणं कळत असे.
त्या काळात ‘इलपमन’ नावाची एक जागा होती. तिथे झाडं आणि माणसं नाचत, गाणी म्हणत आणि खूप आनंद लुटत. ते मित्रांसारखे, भावंडांसारखे तिथे हसत खेळत, मनोरंजन करत ते आपला वेळ घालवत, पण काळ बदलला आणि माणसाच्या मनात वर्चस्वाच्या म्हणजे आपण झाडांपेक्षा हुशार आहोत या भावनेने प्रवेश केला. तो झाडाला कामं सांगू लागला.
‘‘मला शेकोटीसाठी लाकडं दे’’ अशी आज्ञा माणूस झाडाला देई तेव्हा झाड स्वतःला गदागदा हलवून फांद्या पाडी. या वेळी झाडाला खूप वेदना होत. एक दिवस तर माणसाने झाडाच्या अंगावर मोठमोठे दगड ठेवले आणि त्याला एका जागेवरून दुसऱया जागेवर वाहून न्यायला लावले. झाडाला ते ओझं सहन होईना. त्याला ते दगड घेऊन चालता येईना. त्याचे ते चालणे बघून मदत करणे दूरच, उलट माणूस जोरजोरात हसू लागला.

‘‘आपण माणसाला एवढी मदत करतो, पण तो तर आपल्याला हसतो’’ झाडं एकमेकांना म्हणू लागली. त्यांना खूप वाईट वाटलं. ‘‘आपण तर त्यांना आपले मित्र मानत होतो, पण ते तर आपल्याशी वाईट वागताहेत’’ एक झाड म्हणालं. मग सर्व झाडांनी मिळून ठरवलं की, आता आपण अजिबात चालायचं नाही आणि धावायचं नाही. तेव्हापासून झाडं स्थिर झाली. त्यांनी माणसासारखं इकडे तिकडे फिरणं बंद केलं.

झाडं चालत नाहीत हे माणसाच्या लक्षात आलं. झाडं आता माणसाशी बोलत नव्हती, त्यांच्या सोबत नाचत नव्हती, पण आता काही उपयोग नव्हता. त्यांना आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला.
माणसाने त्याची चूक कबूल केली, ‘‘आम्ही तुम्हाला हसणार नाही, पण तुम्ही परत चालायला लागा’’ असं माणूस म्हणाला. झाडांनी ऐकलं नाही, पण त्यांनी आपल्या जुन्या मित्राला मदत करण्याचं मात्र सुरू केलं. आजही माणूस झाडांकडून सावली घेतो, लाकडं घेतो, फळं-फुलंही घेतो. काही माणसं झाडांवर खूप प्रेम करतात, त्यांना पाणी घालतात, त्यांच्याशी गप्पा मारतात आणि त्यांना कुरवाळतात. तेव्हा झाड आनंदाने डोलतं, आपल्या पानांचा सळसळ आवाज करतं, पण त्याने चालण्याचं मात्र सोडून दिलं आहे. अजूनही काही माणसे झाडाशी वाईट वागतात म्हणून झाडं आजही चालत नसतील का? माणूस झाडं तोडत राहिला तर झाड कसं वागेल त्याच्याशी?

साभार – www.atakmatak.com
चित्रकार:- ज्योती महाले