
सामना प्रतिनिधी । शिर्डी
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित राहील्याबद्दल दोन दिवसात ख़ुलासा करावा. ख़ुलासा समाधानकारक नसेल तर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार आपल्या विरुध्द गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस नगर उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांना बजावली आहे.
मुख्याधिकारी सतीश दिघे यांना बजावलेल्या या नोटीसीत म्हटले आहे की, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक २०१८ साठी १२ जुन २०१८ रोज़ी कर्मचारी व अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण जिल्हाधिकारी नगर तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन नगर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे गैरहजर राहिले. निवडणूक विषयक महत्वपूर्ण अशा कामकाजाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या नोटीसीत ठेवण्यात आला आहे.
निवडणुकीच्या कामात हलगर्जी केल्याबद्दल अधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची तरतुद लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मध्यम करण्यात आलेली आहे. या तरतुदीनुसार आपल्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई का करण्यात येवू नये. याबाबत येत्या दोन दिवसात समक्ष उपस्थित राहुन लेखी स्वरूपात ख़ुलासा करावा. हा ख़ुलासा विहीत नमुन्यात प्राप्त न झाल्यास अथवा आपण सादर केलेला ख़ुलासा समाधानकारक असल्याचे आढळून न आल्यास आपल्या विरुध्द लोकप्रतीनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार गुन्हा करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल आणि आपल्या विरुध्द सेवा प्रवेश नियमावलीमधील तरतुदीनुसार निलंबन, बडतर्फीचीं कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे नोटीसीत मुख्याधिकारी सतीश दिघे यांना बजावले आहे.

































































