किल्ले सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा-देशाचा अभिमान – खासदार सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी मालवण दौऱ्यात किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्याची पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्या नतमस्तक झाल्या. किल्ले सिंधुदुर्गवर असलेली अस्वच्छता आणि प्लॅस्टिकचे पसरलेले साम्राज्य याबाबत खासदार सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. हा छत्रपतींचा किल्ला आहे. मोठा इतिहास असलेला हा किल्ला स्वच्छ व सुंदर ठेवणे, पुढच्या पिढ्यापर्यंत हा इतिहास टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या. किल्ल्यावरील अस्वच्छतेबाबत आपण स्वतः राज्य आणि केंद्र सरकारसोबत बोलून पाठपुरावा करू, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे बुधवारी मालवण दौऱ्यावर आल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीने राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या वतीनेही नगराध्यक्ष महेश कांदळगावर व अन्य शिवसेना पदाधिकारी यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत केले. त्यांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी स्थापन केलेल्या मेढा येथील जय गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. गाईड हितेश वायंगणकर तसेच शिक्षिका ज्योती तोरसकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी किल्ले सिंधुदुर्ग बाबत माहिती दिली.

किल्ल्यावर स्वच्छतागृह नसल्याबाबत येथे आलेल्या महिला पर्यटकांनी सुप्रिया ताईंकडे तक्रार केली. याबाबत प्रशासनाशी बोलून लवकरच योग्य ती कार्यवाही करू, असे त्या म्हणाल्या. एकूणच किल्ल्यावरील अस्वच्छता व सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारण हे समाजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारने नेहमीच राजकारण हे समाजकारण करून केले आहे. तोच धागा पकडून यशवंतराव चव्हाण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, सोनिया गांधी या सगळ्यांचे मार्गदर्शन घेत आम्ही पुढे काम करू, असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.