
दापोली तालुक्यात कर्दे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेले सातारा येथील सहा युवक रविवारी दुपारी बुडाले. यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर सौरभ धावडे हा युवक अजूनही बेपत्ता आहे. त्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. या दुर्घटनेमुळे रत्नागिरी जिह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील एकसळ गावातील सहा युवक दुचाकीने कोकण फिरण्यासाठी दापोलीत आले होते. शनिवारी रात्री ते गाडीसह खेड येथील एक पेट्रोलपंपावर थांबले. रात्रभर झोप काढून ते सकाळी दापोली तालुक्यातील हर्णे बंदरावर गेले. तिथे काही वेळ त्यांनी फेरफटका मारला. बंदरावर मासे खरेदी केले. हर्णे बंदराजवळच जेवल्यानंतर ते कर्दे समुद्रकिनारी पाण्यात पोहण्यासाठी पोहोचले. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहाही जण बुडू लागले. यातील पाच जणांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश आले, मात्र यातील एक तरुण खोल समुद्रात बेपत्ता झाला आहे.
कर्दे समुद्रकिनाऱ्यावरील स्पीडबोटीचा व्यवसाय बंद असल्याने त्याला वाचवण्याचे प्रयत्न अपुरे पडले. मात्र उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. या घटनेचे वृत्त कळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस आदींनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली.
स्थानिकांच्या बचावकार्याला यश
मकरंद नरवणकर, मकरंद तोडणकर या स्थानिक तरुणांनी दोऱया व लाइफ जॅकेटच्या सहाय्याने सरपंच सचिन तोडणकर यांच्या उपस्थितीत हे बचावकार्य यशस्वी केले. दरम्यान, बुडालेल्या युवकासाठी लाडघर येथील एका जेटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे.
तरुणांची नावे
कार्तिक घाडगे (20), यश घाडगे (19), दिनेश चव्हाण (20), अक्षम शेलार (19), कुणाल घाडगे (30) यांना वाचवण्यात यश आले आहे, तर सौरभ धावडे (19) हा युवक बेपत्ता आहे.
































































