
कोरोनाची दुसरी लाट सुसाट सुटली असून, शहरात दररोज सरासरी 10 जणांचा मृत्यू होत आहे. मे 2020मध्ये शहराचा मृत्यूदर 10.50 टक्के होता, तर जूनमध्ये 11.46 टक्क्यांवर गेला होता. आता रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने मृत्यूदर कमी असल्याचे चित्र आहे; परंतु प्रत्यक्षात मृत्यूदर खूपच वाढला असून, सोलापूर शहर पुन्हा राज्यातील पहिल्या 10 शहरांमध्ये पोहोचले आहे. नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, साताऱ्यानंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. सद्यःस्थितीत रुग्णसंख्येच्या प्रमाणात सोलापूर शहराचा मृत्यूदर 4.22 टक्के आहे.
सोलापूर शहरात आतापर्यंत दोन लाख 33 हजार संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यांत 19 हजार 700 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, त्यांतील 827 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता शहरात दररोज सरासरी 10 रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत सहा लाख 86 हजार 795 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात तब्बल 52 हजार 511 जण पॉझिटिव्ह आले असून, त्यांतील एक हजार 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर पहिल्या लाटेच्या तुलनेत आता पुन्हा वाढू लागला आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचे रुग्ण व मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. उशिरा रुग्णालयात दाखल होणाऱयांची संख्या मोठी असल्याने ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड व व्हेंटिलेटर्सदेखील कमी पडू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात मृत्यूदराची नोंद केली जाते. सोलापूर शहराचा सरासरी मृत्यूदर 4.22 टक्के असून, एप्रिल महिन्यातील मृत्यूदर 2.98 टक्के इतका असल्याचे सोलापूर महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी शिरीष धनवे यांनी सांगितले.




























































