नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत दहावीचा परीक्षा अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीपाठोपाठ दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यासही मुदतवाढ दिली आहे. दहावीचे नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले, खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे विद्यार्थी आता 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन परीक्षा अर्ज भरू शकतात.

परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत आधी 25 नोव्हेंबरपर्यत होती, मात्र या मुदतीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार असून विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यास मुदत देण्यात येणार असून त्याच्या तारखा लवकरच कळविण्यात येतील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.