
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मनोरंजनसृष्टीवर पसरलेला अंधःकार आता दूर होताना दिसतोय. ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडसह हॉलीवूडचे तब्बल तीन बिग बजेट चित्रपट भेटीला येणार आहेत.
कोरोनाची साथ नियंत्रणात येताच राज्यात 22 ऑक्टोबरपासून नियम-अटींसह चित्रपट आणि नाटय़गृहे सुरू झाली आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ हा बॉलीवूडचा पहिलाच बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे ‘सूर्यवंशी’कडून बॉलीवूडकरांना बऱयाच अपेक्षा आहेत. अक्षय कुमार-कतरिना पैफ यांची मुख्य भूमिका आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. याशिवाय रणवीर सिंह आणि अजय देवगण हेदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बुक माय शोवर ऑनलाइन बुपिंगला तुफान प्रतिसाद मिळतोय.
‘सूर्यवंशी’ला टक्कर देण्यासाठी याच दिवशी सुपरहीरो चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉलीवूडच्या मार्व्हल स्टुडिओचा ‘इटर्नल्स’ हिंदुस्थानात सहा भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर विजेते क्लो झाओ यांनी केले आहे. यात अँजेलिना जोली मुख्य भूमिकेत असून पृथ्वीवर येऊन गुप्तपणे राहणाऱया परग्रहवासीयांवर चित्रपटाची कथा बेतली आहे. याशिवाय सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. परदेशातील तब्बल 1100 थिएटरमध्ये ‘अन्नाथे’ झळकणार आहे.
‘लायन्सगेट’चा फ्रायडे धमाका
‘लायन्सगेट प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नोव्हेंबर महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. 5 नोव्हेंबरला साय-फाय थ्रिलर ‘टाइड्स’, अॅक्शनपट ‘दी ग्रे’ आणि ड्रामा सीरिज ‘प्रेस’चा प्रीमियर होणार आहे. 12 नोव्हेंबरला ‘माल्कम एक्स’ आणि ‘लव्ह लाइफ’चा तर 26 नोव्हेंबरला ‘सिकारिओ’चा आणि ‘डब्लिन मर्डर्स’चा प्रीमियर होईल. ‘डब्लिन मर्डर्स’ या सायकॉलॉजीकल थ्रिलरची कथा अमेरिकन-आयरिश लेखिका ताना फ्रेंच यांच्या ‘इन द वुड्स’ आणि ‘द लाइकनेस’ या पुस्तकांवर आधारित असून यामध्ये किलीयन स्कॉट आणि सारा ग्रीन यासह आयरिश कलाकारांचा समावेश आहे.




























































