श्रीलंकेसह नेदरलॅण्ड्स सुपर-12 फेरीत, बलाढय़ श्रीलंकेने नेदरलॅण्ड्सला 16 धावांनी केले पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेल्या माजी विजेत्या श्रीलंकेने टी-20 विश्वचषक पात्रता फेरीतील रोमांचक लढतीत नेदरलॅण्ड्सवर 16 धावांनी विजय मिळवून टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यात आपले स्थान पक्के केले. सलामीवीर कुसल मेंडिसच्या 44 चेंडूंत 79 धावा आणि वानिंदू हसरंगाच्या 28 धावांत 3 विकेट घेतल्याने श्रीलंकेने अटीतटीच्या सामन्यात नेदरलॅण्ड्सवर 16 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे ‘अ’ गटात श्रीलंकेने दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलॅण्ड्सच्या पुढे धावगतीच्या बळावर आघाडी घेतली. पात्रता फेरी ‘अ’ गटातील दुसऱ्या लढतीत यूएईने नामिबियावर 7 धावांनी विजय मिळवत नेदरलॅण्ड्ससाठी सुपर-12 फेरीचे दार उघडे करून दिले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 6 बाद 162 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यांच्या सलामीवीर कुशल मेंडिसने 44 चेंडूंत 74 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. कुशलला उत्तम साथ देत चरिथ असलंकाने 30 चेंडूंत 31 धावांची झटपट खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या गाठता आली.

प्रत्युत्तरादाखल नेदरलॅण्ड्स संघाला निर्धारित 20 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात 146 धावाच करता आल्या. त्याच्या वतीने सलामीवीर मॅक्स ओडॉडने एकटय़ाने किल्ला लढवला. त्याने 71 धावा केल्या. बाकीचे फलंदाज संघाच्या विजयासाठी फार काही करू शकले नाहीत. ओडॉडने 53 चेंडूंत नाबाद 71 धावांची मॅरेथॉन खेळी करीत संघाचा पराभव टाळण्याचे शिकस्तीचे प्रयत्न केले, पण त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 146 या धावसंख्येवरच आटोपला.

यूएईने विजय मिळवत केले नामिबियाला स्पर्धेबाहेर

पात्रता फेरी ‘अ’ गटातील दुसऱया लढतीत यूएईने नामिबियाला केवळ 7 धावांनी पराभूत करीत नेदरलॅण्ड्सच्या सुपर-12 प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. कारण 2 विजय आणि 4 गुणांसह सरस धावगतीच्या आधारावर नेदरलॅण्ड्स या गटातून सुपर-12 फेरीसाठी पात्र ठरला. उद्या ‘ब’ गटातील वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड आणि स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे या लढतींनंतर सुपर-12 फेरीस पात्र ठरणारे ‘ब’ गटाचे दोन संघ निश्चित होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलॅण्ड्स हे संघ आता हिंदुस्थानच्या गट-2 मध्ये सामील झाले आहेत, तर ‘ब’ गटातून सुपर-12 फेरी गाठणारे संघ ऑस्ट्रेलियाच्या गट-1 मध्ये सामील होणार आहेत.

बीसीसीआयने रोहित शर्माच्या चर्चेचा 36 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केलाय. तो म्हणाला, ‘लढतीदरम्यान खेळाडूंनी स्वतःला शांत आणि संयमी ठेवल्यास मनासारखा निकाल लागू शकेल. जगज्जेते होऊन 15 वर्षे झालीत. त्यामुळे अर्थातच यंदा आम्हाला पुन्हा विश्वचषक जिंकायचाय, मात्र जेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ठरलेल्या योजनेनुसार खेळ करावा लागणार आहे. मात्र इतक्यात आम्ही उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंतचा विचार करणार नाही. फक्त एक-एका लढतीवर लक्ष्य केंद्रित करून आम्ही आगेकूच करू,’ असेही त्याने सांगितले.

पावसाची शक्यता!

हिंदुस्थान व पाकिस्तानदरम्यानचा सामना रविवारी हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार ही लढत सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, मात्र तेथील हवामान खात्याने रविवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मेलबर्नमध्ये रविवारी सकाळी 85 टक्के, दुपारी 75 टक्के, तर रात्री 76 टक्के पावसाची शक्यता आहे.