
कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने आणि टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने खिशात घालणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला आता वन डे मालिका खिशात घालण्याचे वेध लागले आहेत. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये उद्यापासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला पुण्यातील एमसीए स्टेडियम, गहुंजे येथे सुरुवात होणार आहे. ओएन मॉर्गनचा इंग्लंड संघ या दौऱयाचा शेवट गोड करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
कर्णधार टी-20मधील फॉर्म कायम ठेवणार
कर्णधार विराट कोहलीने टी-20 मालिकेत तीन अर्धशतकांसह धावांचा पाऊस पाडला आणि मालिकावीराचा मान संपादन केला. आता हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. वन डे क्रिकेटमध्ये त्याने अखेरचे शतक 2019 सालामध्ये ऑगस्ट महिन्यात झळकावले होते. वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने 114 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर मात्र त्याला अद्याप शतक झळकावता आलेले नाही. उद्यापासून सुरू होणाऱया मालिकेत तो यासाठीही जीवाचे रान करताना दिसेल.
मधल्या फळीत चुरस
टीम इंडियाच्या मधल्या फळीत कमालीची चुरस दिसून येत आहे. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांडय़ा व लोकेश राहुल यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसावे लागू शकते. सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या मुंबईकरांनी टी-20मध्ये छान फलंदाजी केली. त्यामुळे सुमार फॉर्ममधून जाणाऱया लोकेश राहुलला पुन्हा एकदा ‘बेंच’वर बसावे लागू शकते.
गब्बरसाठी महत्त्वाची मालिका
35 वर्षीय शिखर धवनसाठी उद्यापासून सुरू होणारी वन डे मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पहिल्या टी-20 लढतीत अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर शिखर धवनला ‘बेंच’वर बसवण्यात आले. ही मालिका जिंकण्यात टीम इंडियाला यश लाभले. ‘गब्बर’ या नावाने ओळखल्या जाणाऱया शिखर धवनची गरज कुणालाही भासली नाही. तसेच सध्या हिंदुस्थानकडे सलामीसाठी रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्यासह शुभमन गिल हे अंतिम पंधरामधील तसेच पृथ्वी शॉ व देवदत्त पड्डीकल हे सध्या बाहेर असलेले खेळाडू पर्याय आहेत. त्यामुळे शिखर धवनला या मालिकेत संधी मिळाल्यास चमक दाखवावीच लागणार आहे.
आर्चरच्या अनुपस्थितीत वूडवर मदार
जोप्रा आर्चर या मालिकेत खेळणार नाहीए. जो रूटनेही या मालिकेमधून माघार घेतलीय. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ओएन मॉर्गनच्या इंग्लंड संघासमोर खडतर आव्हान असणार आहे. ओएन मॉर्गनसह जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय यांच्यावर फलंदाजीची तर मार्क वूड, अदिल रशीद यांच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे. बेन स्टोक्स व मोईन अली यांच्या अष्टपैलू कामगिरीवरही पाहुण्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.
टी-20मुळे वन डे मालिकेकडे दुर्लक्ष
सध्या क्रिकेट तीन प्रकारांत खेळले जात आहे. कसोटी, वन डे व टी-20. या वर्षी (2021) व पुढल्या वर्षी (2022) टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये वन डे क्रिकेटकडे फारसे लक्ष दिले जाणार नाही. जगभरातील सर्व संघ टी-20 या प्रकाराकडेच अधिक लक्ष केंद्रित करतील. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील वन डे मालिकाही पूर्वनियोजित दौऱयाची पूर्तता व्हावी यासाठीच खेळवण्यात येत आहे.
प्रसिद्ध कृष्णाला संधी?
हिंदुस्थानचे वेगवान गोलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. भुवनेश्वरकुमार, शार्दुल ठाकूर यांचे संघातील स्थान पक्के असेल. टी. नटराजन, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी कुणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळतेय हे पाहणे रंजक ठरेल. तसेच युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांपैकी दोघांनाच अंतिम अकराचे तिकीट मिळेल.
पहिली वन डे
हिंदुस्थान – इंग्लंड
दुपारी 1.30 वाजता




























































