
राष्ट्रीय जनता दलाच्या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आरजेडी सुप्रीमो लालुप्रसाद यादव यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केले. ‘माझ्यानंतर माझा धाकटा मुलगा आणि बिहारचा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हाच पक्षाचा नेता असेल. पक्षांतर्गत जे काही निर्णय होतील, ते सर्व निर्णय तेजस्वीच घेईल’, अशी घोषणा लालूंनी केली आहे. लालूंच्या या वक्तव्यानंतर पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे तेजस्वी यांच्या हातात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजच्या बैठकीनंतर उद्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. यामध्ये लालुप्रसाद यादव यांना राष्ट्रीय जनता दलाचे बिनविरोध अध्यक्ष होण्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा झालेले ठराव परिषदेत मंजूर केले जातील. या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले जाऊ शकते. तेजस्वी यादव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दिला होता. मात्र जगदानंद सिंह बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.




























































