तेलंगणात रेवंत रेड्डी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणात मुख्यमंत्री पदावर कोण येणार, त्या व्यक्तिचं नाव निश्चित झालं आहे. तेलंगणाचे राज्य काँग्रेस प्रमुख रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून 7 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. केसी वेणुगोपाल यांनी एका पत्रकार परिषदेत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

तेलंगणात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात रेड्डी यांचं योगदान मोठं आहे. तसंच, रेड्डी यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी लोकांसोबत काम केलं असून तेलंगणातील नागरिकांनी त्यांच्या आश्वासनांवर मतं दिली आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्री म्हणून रेड्डी यांच्या नावाची घोषणा होत असल्याचं वेणुगोपाल यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

तेलंगणा विधानसभेसाठी 119 जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यात काँग्रेसने 64 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसचा प्रतिस्पर्धी असलेल्या भारत राष्ट्र समितीला 39 जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपला फक्त 8 जागा मिळवता आल्या.