रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचा शिवसेनाला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीने पाठिंबा जाहीर केला.

कोकणात पर्यावरणाचा नाश करणारे  प्रकल्प आणण्याचा घाट राज्य सरकारने वारंवार केला, मात्र कोकणवासीयांनी एकजुटीने याला विरोध केला आहे. कोकणी माणूस आणि कोकणच्या पर्यावरणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका कोकणी माणूस विसरणार नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेने (नाणार विभाग) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी झटणाऱया शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकणात कोणत्या परिस्थितीत महाप्रदूषणकारी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प होता कामा नये, अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनीही जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे उपाध्यक्ष राजाराम कुवरे यांनी दिली.