घबाड समजून चोरटय़ांनी ईव्हीएमची बॅग पळवली

पुण्यातील डमी ‘ईव्हीएम’प्रकरण; तीन अधिकारी निलंबित, उपविभागीय अधिकाऱयासह तहसीलदाराचा समावेश, निवडणूक आयोगाकडून दखल

पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यात स्ट्राँगरूममधून ‘डमी ईव्हीएम’ मशीनची चोरी झाली होती. याप्रकरणी तीन अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले असून त्यात उपविभागीय अधिकाऱयासह तहसीलदाराचा समावेश आहे. ईव्हीएम मशीन एका बॅगेमध्ये होती आणि त्या बॅगेत काही घबाड असेल या उद्देशाने चोरांनी ती बॅग पळवून नेली, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीकांत देशपांडे यांनी या घटनेबाबत आणि कारवाईसंदर्भात माहिती दिली. पेंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन पुणे जिह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पुरंदरच्या तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

पुणे जिह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरिता उपविभागीय अधिकाऱयांचे मुख्यालय सासवड येथे आहे. ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमासाठी वापरावयाच्या 40 ईव्हीएम मशीन तेथील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. शनिवार किंवा रविवारी या ईव्हीएमपैकी एक पंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यासोबत कोरे पेपर, 5 रीम, पेन व अन्य स्टेशनरीसुद्धा चोरीला गेली, असेही देशपांडे यांनी सांगितले.

राज्यामध्ये 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिद्धीचा कार्यक्रम सर्व जिह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या 10 टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (स्ट्राँगरूम) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिद्धीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम, त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकाऱयांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार-प्रसिद्धी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.

सविस्तर चौकशीसाठी समिती

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.