
शहरातील सावेडी उपनगरात भिस्तबाग चौक परिसरात चोरटय़ांनी एका बंगल्यात धाडसी घरफोडी करत सुमारे 41.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 10 हजार रुपयांची रोकड असा 13 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.11) पहाटे घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित अरविंद गर्गे (वय 55, रा. सुदर्शन रो हौसिंग, साईरामनगर, भिस्तबाग चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
गर्गे यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे पाहुणे व नातेवाईक आलेले होते. शुक्रवारी (दि.10) रात्री सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर रात्री 12 ते शनिवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरटय़ांनी घरात प्रवेश करत पाहुण्यांच्या बॅगा तसेच कपाटातील दागिने चोरून नेले. पहाटे 5च्या सुमारास झोपेतून जाग आल्यानंतर ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चोरीला नेमका किती ऐवज गेला, याची माहिती संकलित केल्यावर तब्बल 41.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 10 हजार रुपयांची रोकडे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
यामध्ये 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व बांगडय़ा, 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 2.5 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 1 तोळे वजनाचा नेकलेस, 2.4 तोळे वजनाच्या 3 अंगठय़ा, 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर तसेच फिर्यादी गर्गे यांची बहीण माधवी सुहास पतके यांनी बॅगमध्ये ठेवलेले 5 तोळे वजनाचे सोन्याचे तोडे, 10 हजार रुपयांची रोकड फिर्यादी गर्गे यांच्या वहिनी रुपाली गर्गे यांनी बॅगेत ठेवलेल्या 8 तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व बांगडय़ा, 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन, 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 1 तोळे वजनाची सोन्याची अंगठी अशा दागिन्यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.




























































