अंधाऱ्या रात्री वाऱ्याच्या वेगाने चोऱ्या करणारी दुकली गजाआड

87

सामना प्रतिनिधी, मुंबई

अंधाऱ्या रात्री रिक्षातून उच्चभ्रू वस्तीत रेकी करायची. वॉचमन झोपलेत, पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटस्ला ग्रील नाही अशी घरे हेरून शिताफीने चोऱ्या करणाऱ्या एका सराईत अल्पवयीन मुलासह रिक्षाचालकाला जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या चोरांकडून महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून अनेक गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जुहू येथील नवव्या रस्त्यावर रोजा ऑर्चिड नावाची इमारत आहे. 17 ऑक्टोबरच्या रात्री रिक्षाचालक राहुल खरवार (24) आणि रवी पासी हे दोघे जुहू परिसरात रेकी करत होते. त्यावेळी रोजा ऑर्चिड इमारतीचे दोन्ही वॉचमन झोपेत असल्याचे रवीच्या नजरेस पडले. मग तोंडावर रुमाल बांधून व डोक्यात टोपी घालून रवी इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसला. तेव्हा पहिल्या मजल्यावरील विनोद भोजनिया या व्यावसायिकाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा व पंख्याचा आवाज येत असल्याचे रवीने हेरले. मग कंपाऊंडमध्ये कोणी नसल्याची खातरजमा करून तो कचऱ्याच्या डब्याच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावरील भोजनियांच्या घरात घुसला आणि महागडे मोबाईल, रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. दुसऱ्या दिवशी घरमालकाने जुहू पोलिसांत तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बिरादार अंमलदार नरेश ठाकूर, महादेव तोडणकर, चंद्रकांत वलेकर, सुहास भोसले, महेंद्र यादव, अजय साळुंखे, अंनिस पाटील या पथकाने तपास सुरू केला.

आरोपींनी रुमालाने तोंड झाकल्यामुळे त्यांचा काही थांगपत्ता लागत नव्हता. वलेकर, भोसले यांनी इमारत व परिसरातील सीसीटीव्हींचा बारकाईने अभ्यास केला तसेच खबऱ्यांना कामाला लावले. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना एक चोरटा जुहू परिसरात येणार असल्याची खबर पथकाला मिळाली. त्यानुसार गस्त घालत असताना जुहू परिसरात रवी पोलिसांच्या हाती लागला. मग त्याचा साथीदार राहीलादेखील पकडले.

सीसीटीव्ही, टी शर्ट अन् चपळाई
गुन्हा घडला तेव्हा चोराने ‘बी’ हे इंग्रजीत असलेले अक्षर टी शर्टवर लिहिलेले होते. हाच धागा पकडून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या रवीला चपळाईने उचलले. आरोपींकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून त्यांनी जुहू, वर्सोवा, अंबोली, ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली.

summary- thieves got arrested by police

आपली प्रतिक्रिया द्या