सुंदर…सुकुमार पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अपर्णा शिरवडकर

नाजूक… गोरीपान पावले प्रत्येकीलाच हवीहवीशी. पण थंडी मात्र या सौंदर्य कल्पनेला पार तडे देते. हिवाळ्यात पावले कोरडी पडणं, टाचा फुटणं, त्यातून रक्त येणं ही एक आम बाब असली तरी त्यातून पाय वाईट दिसतातच शिवाय चालायलाही त्रास होतो. कशी राखावीत आपली पावले… मुलायम… सुकुमार…?

हिवाळ्यात स्लीपर किंवा अर्धा अधिक पाय उघडा ठेवणाऱ्या चपला वापरण्याऐवजी बूट वापरावेत. पायांची नखे कापताना बोटांलगत न कापता अंतर ठेवून कापावीत. त्वचा कोरडी पडली असेल तर मुलायम होण्यासाठी मॉईश्चरायझर क्रीम किंवा तेलाचा वापर करावा. भोवरी असेल तर ती वेळीच काढून टाकावी.

पायांची त्वचा कोरडी असेल तर

पायांची त्वचा जास्त कोरडी असेल तर जास्त काळजी घेणे आवश्यक  आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर त्यांच्या स्वच्छतेकडी लक्ष द्यावे. त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहण्यासाठी कधीही उघड्या पायांनी फिरू नये. पायात नेहमी बूट-चप्पल घालावेत. शक्य असल्यास घरच्या घरी मेनिक्युअर- पेडिक्युअर करावे. कोरड्या पायांसाठी दररोज रात्री पाय धुऊन त्यांना क्रीम लावून झोपावे. यामुळे ते कोमल होतील. पायांना जास्त गरम पाण्यांनी धुऊ नये.

मॉइश्चरायझर क्रीम घेताना?

पायांची त्वचा मुलायम होण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ युक्त जैतून तेल वापरावे. जैतून तेलात भरपूर अँण्टिऑक्सिडंटयुक्त असते. यामुळे त्वचा मऊ बनते. शिवाय ज्या क्रीम जास्त प्रमाणात ऑईल बेस आहेत अशा क्रीमची निवड करावी. त्वचा खूपच नाजूक असेल तर बेबी ऑईल क्रीमही वापरू शकता. शिवाय जास्त रासायनिक पदार्थ नसलेल्या आणि माईल्ड क्रीम, चांगल्या दर्जाच्या मॉईश्चरायझर क्रीमची निवड करावी. जीवनसत्त्व आणि प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. पायांच्या त्वचेसह पायांच्या नखांचीही देखभाल करावी.

घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर

  • वेळोवेळी पेडिक्युअर केल्याने पायाच्या त्वचेला नरमपणा येतो.
  • आंघोळ करताना पायांना व्हॅसलीन तेल इत्यादी लावावे.
  • बाहेर जातानाही पायांवर चांगल्या क्वालिटीचे मॉईश्चरायझर क्रीम लावावे.
  • गरम पाण्यात शाम्पू, थोडंसं ग्लिसरीन किंवा हायड्रोजन पॅरॉक्साईड घालावं. 10 ते 15 मिनिटे या पाण्यात पाय घालून बसावं. नंतर पाय पुसून पाऊल, टाचा, नखं साफ करावीत. नंतर पाय पुसून पायाला ऑईल बेस क्रिम लावावं, मसाज करावा.
  • कोमट पाण्यात गुलाबपाणी, हायड्रोजन पॅरॉक्साईड घालून 10 मिनिटे या पाण्यात पाय ठेवायचे. त्यानंतर साखर, कॉफी पावडर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून साखर वितळेपर्यंत पायांना मसाज करावा. यामुळे डेड स्किन निघून जाते. त्यानंतर कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवायचे.

पाय खूप फुटत असतील तर

  • कोमट पाण्यात गुलाबपाणी घालून त्यात थोडा वेळ पाय ठेवावे. त्यानंतर पाय पाण्याबाहेर काढून त्यांना मॉइश्चरायझर क्रीम लावून सॉक्स घालावेत. घरात असताना स्लीपर घालावी.
  • हिवाळ्यात ओले मोजे घातले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यामुळे सर्दी होईल.
  • पाय कोरडे पडू नयेत म्हणून फूट लोशन्स किंवा क्रीम लावावी.
  • थंडीच्या दिवसांत पेडिक्युअर किंवा मेनिक्युअर करणं केव्हावी चांगलंच आहे.
  • एरंडेल तेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून दोन वेळा लावा. यामुळे टाचा लवकर भरतील.
  • साखर आणि सायीचं मिश्रण टाचांवरील भेगांवर लावल्याने भेगा कमी होतात.
  • पायाच्या टाचांना कांद्याचा रस लावल्यास टाचा नरम आणि मुलायम होतात.
  • भेगांचा त्रास कमी करण्यासाठी ग्लिसरीन वापरावे.
  • आंघोळीनंतर मोहरीच्या तेलात हळद घालून भेगांवर लावावी. भेगा लवकर भरून निघतात.
  • झोपताना पायांना मॉइश्चराइझ क्रिम लावल्याने त्वचा मऊ होतील.
  • कडुलिंबाच्या पाल्याचा रस भेंगांना लावल्याने भेगा कमी होतात.
  • बोरिक पावडर, व्हॅसलिन आणि ऑलिव्ह ऑइलचे एकत्रित मिश्रण पायांच्या भेगांना लावल्याने त्रास कमी होतो.
  • ऑलिव्ह ऑईल, लिंबू आणि दुधाची साय भेगांना लावल्यास भेंगाची जळजळ कमी होतं.

रात्री झोपण्यापूर्वी… 

  • रात्री झोपण्यापूर्वी पायांना नारळाचे तेल लावावे.
  • व्हिनेगरच्या वापराने पाय व हातावरील खडबडीतपणा जातो. यासाठी पायांना व्हिनेगर लावल्यानंतर गरम पाण्यात पाय काही वेळ भिजवा. नंतर ब्रशने पाय घासा. पाय मुलायम होतील.
  • पायांच्या त्वचेलाही स्क्रब करावे. कारण यामुळे पायांच्या त्वचेची छिद्रे मोकळी होऊन त्वचेला तजेला येतो.
  • रात्री झोपताना पायांना हलक्या हाताने तेल लावून मसाज करावा.
  • रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टूथब्रशने टाचा हलक्या हाताने घासा.

लेखिका सौंदर्यतज्ञ आहेत.