
हिंदुस्थानची रौप्यपदक विजेती ज्युडोपटू तुलिका मानवर राष्ट्रकुल स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेच्या (नाडा) नियमांचे पालन न केल्याप्रकरणी तिला निलंबित करण्यात आले आहे. 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची आशा होती, पण आता तिला स्पर्धेत खेळताच येणार नाही. ‘नाडा’च्या नियमांनुसार खेळाडूंना आपण कुठे वास्तव करत आहोत याची माहिती देणे आवश्यक असते. गेल्या 12 महिन्यांत आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाबाबतची माहिती देण्यात तीनदा अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ज्युडो संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी अरुण कुमारलाही ‘नाडा’ने निलंबित केले होते.



























































