Turkey Earthquake तुर्की आणि सीरियाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, 900हून अधिक लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारची पहाट तुर्की आणि सीरियातील लोकांसाठी प्रलयकारी ठरली आहे. सकाळी चारच्या सुमारास तुर्की आणि सीरिया 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने हादरले. यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून यात आतापर्यंत 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती राउटर्स या संस्थेने दिली आहे. मृतांचा आकडा आगामी काळात वाढण्याही भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्थानमधील गाझियांपेट शहराजवळील नूर्दगी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आणि सीरियाच्या सीमेपासून 90 किलोमीटर दूर आहे. भूपृष्ठापासून जवळपास 14.1 किलोमीटर खाली या भूकंपाचे केंद्र असून भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे तुर्कीसह सीरियामध्येही प्रचंड नुकसान झाले आहे. अलेप्पो आणि हमा या दोन शहरांमधील अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. आतापर्यंत 912 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींचा आकडाही जास्त असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मोदींनी व्यक्त केला शोक

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या नैसर्गित आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्कीला शक्य ती मदत करण्याचे शब्द मोदींनी दिला आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेली जीवित आणि वित्तहानीमुळे दु:ख झाले असून आपल्या कुटुंबियांना गमावलेल्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखम लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इश्वरचरणी प्रार्थना. या नैसर्गिक आपत्तीमध्ये हिंदुस्थान तुर्कीच्या नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ट्विट मोदींनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय पथके आणि इतर मदत सामग्री तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह 100 कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचावकार्यासाठी रवाना होण्यास सज्ज झाल्या आहेत. यासह अत्यावश्यक औषधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि वैद्यकीय पथकेही तयार आहेत.

‘ते’ ट्विट व्हायरल

दरम्यान, तुर्कीसह सीरियामध्ये झालेल्या या भूकंपाची कल्पना ssgeos या संस्थेमध्ये काम करणारे संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तीन दिवसांपूर्वीच दिली होती. 3 फेब्रुवारी रोजी त्यांनी या संदर्भात ट्विट केले होते. दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन या भागात नजीकच्या काळामध्ये 7.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. यासोबत त्यांनी भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता.