दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; भाजप, शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांसह चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन अल्पवयीन मुलींवर उलवे नोडमधील एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचा पेणमधील माजी स्वीकृत नगरसेवक कुणाल नाईक आणि शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर याच्यासह चार जणांना उलवे पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचारपीडित मुली या १३ वर्षे वयोगटातील आहेत. त्यामुळे उलवे पोलिसांनी या चारही आरोपींविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बेलापूरमध्ये स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवणाऱ्या सारिका गायकवाड या दलाल महिलेने दोन १३ वर्षीय मुलींना उलवे येथील ‘ला रेसिडेन्सी’ लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी हॉटेलवर छापा टाकला आणि या दोन्ही मुलींची सुटका केली. या प्रकरणी सारिका हिला अटक करण्यात आली. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या दोन्ही मुलींवर पेण नगर परिषदेतील भाजपचा माजी स्वीकृत नगरसेवक कुणाल नाईक, पेणमधील शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर, प्रमोद पाटील आणि अच्युत पाटील यांनी सामूहिक अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर उलवे पोलिसांनी या चौघांच्याही मुसक्या आवळल्या. न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

माथाडी युनियनच्या पदाधिकाऱ्याचा तरुणीवर अत्याचार

कर्जत-नेरळ परिसरातील एका २७ वर्षीय तरुणीवर माथाडी कामगार युनियनचा पदाधिकारी राजेश महाडिक याने अत्याचार केल्याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश आणि या तरुणीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर राजेशने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी राजेश आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजेशच्या इशाऱ्यावरून या तिघांनी पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिला मारहाण केली होती.