निवडणुकीपूर्वी सबका साथ आणि निवडणुकीनंतर दोस्तोंका विकास! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मोदी कोकणात येताना कोकणासाठी काहीतरी भरघोस घेऊन येतील असं मला वाटलं होतं, पण द्यायचं तर सोडाच पण इथला प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून गेले. इथले सगळे प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. त्यांचं ठरलं आहे, सगळ्यांना एकत्र करायचं, निवडणुकीपूर्वी सबका साथ मागायचं आणि निवडणुकीनंतर दोस्तोंका विकास करायचा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.

चिपळूण येथील जनसंवाद सभेत त्यांनी मिंधे गटावर आणि भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला नेहमी नाती सांगत बसण्याची आवश्यकता लागलेली नाही. चिपळूण हे माँचं माहेरघर, माझं आजोळ. तसं शिवसेनाप्रमुखांची आई ही अमरावतीतली परतवाड्यातली. पण मी असं कधीही म्हटलेलं नाही की भाईओ और बहनों, मेरा और चिपळूण का बहोत पुराना रिश्ता है. रिश्ता निभानेवाला चाहिये, दिखानेवाला नही चाहिये. रिश्ता है तो निभाव… हे नुसते रिश्ते असतात. पण संकटात सोबत येतात ते फरिश्ते असतात. तुम्ही सगळे माझे फरिश्ते आहात. हे सगळं संकट मी मानतच नाही. पण प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं. माझ्या आजोबांनी शिकवलंय की संकट आलं की त्याच्या छाताडावर चालून जा. तसं संकटाच्या छाताडावर चालून जातो मी. जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्या आजूबाजूच्यांचे बुरखे फाटतात. खरं कोण आणि खोटं कोण कळतं. सगळं काही देऊनसुद्ध ज्यांची लाळ गळत असते, ते मुखवटे गळल्यावर कळतं. आज असेच सगळे लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत. इकडे तर चिपळूणमध्ये धरणं फोडणारे खेकडे एकत्र गेले आहेत. आता खेकडा नेहमी तिरकाच चालणार, पण खेकड्याचं काय करायचं याची तुम्हाला कल्पना आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थित शिवसैनिकांमध्ये एकच खसखस पिकली.

‘मी भाजपला कमळाबाई म्हणतो. हा शब्द बाळासाहेबांनी दिला. मी तर घराणेशाहीवाला आहे आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणारा आहे. म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना संपेल. 2014सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते. मग मी त्यांना प्रश्न विचारतो, पण कुणी धड उत्तर देत नाही. आज जे पंतप्रधान घराणेशाहीविरोधात टाहो फोडताहेत. 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. जे पक्षप्रमुख नसल्याचं म्हणताहेत, त्यांनी पाठिंबा कुणाचा घेतला होतात? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी, तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे पत्रावर सही केली होती. तिथे युतीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी दावेदार म्हणून घोषित करत आहोत, अशा पत्रावर माझी सही का घेतली होती? 2019लाही तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं. अमित शहांनी मला का बोलवलं होतं. 2018मध्ये जी युती तुटल्यात जमा होती, ती पुन्हा जोडण्यासाठी मातोश्रीवर तुम्ही का आला होतात? जो आता पक्षप्रमुख म्हणताय त्या मिंध्याकडे का गेला नव्हता? मिंध्यांनी जर असं सांगितलं असतं की आपण भाजपसोबत जायचंय, तर तुम्ही गेला असतात? मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात? तोपर्यंत तुम्हाला माहीत होतं की पक्षप्रमुख आहे. पण मोदी आत्ता तुम्ही जो घराणेशाहीविषयी जो टाहो फोडताय.. माझं म्हणणं आहे की घराणेशाहीविषयी बोलणारा माणूस स्वतः घरंदाज असायला हवा. त्याचं घरदार-कुटुंब सांभाळून जर तो बोलतो तर मी समजू शकतो. इथे तुमचा स्वतःचा काही पत्ता नाही आणि तुम्ही घराणेशाहीविषयी बोलताय? 2014ला माझा पाठिंबा घेताना हे तुम्हाला माहीत नव्हतं की हा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे, याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे, 2019मध्येही हे माहीत नव्हतं. मग हे जे काही सगळं ढोंग आणि हरामखोरपणा आहे.’ असे आसूडही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ओढले.

‘माझी अशी अपेक्षा होती की मोदी कोकणात येताहेत तर कोकणासाठी भरघोस काहीतरी देऊन जातील. द्यायचं तर सोडाच पण इथला पाणबुडी प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून गेले. आता शिवनेरीला येताहेत, काय पळवतील सांगता येत नाही. इथला बल्कड्रग पार्क, डायमंड मार्केट, टाटा एअरबस, वेदांत फॉक्सकॉन सगळे प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. आपले चाळीस गद्दारही पहिले गुजरातला गेले. दावोसमधून काय आणलं ते विचारायचं नाही. मग सगळ्यांना एकत्र करायचं, चारच गोष्टींवर काम करायचं आणि निवडणुका आल्यावर सबका साथ आणि निवडून आल्यावर दोस्तोंका विकास करायचा, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.