‘मी आणि माझी खुर्ची’ ही मोदींची एकाधिकारशाही देशाला मान्य नाही, सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना तुमच्यासोबत होती म्हणून तुम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचलात, पण आता ते तुम्हाला शक्य नाही. ‘मी आणि माझी खुर्ची’ ही जी तुमची एकाधिकारशाही आहे ती आम्हाला आमच्या देशात मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आयोजित जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. सोलापूर मतदारसंघात भाजपने बाहेरचा उमेदवार लादला आहे. बाहेरून पार्सल आणले आहे असे लोक बोलताहेत. भाजपवाले उद्योग महाराष्ट्राबाहेर नेताहेत आणि कांद्यावर अजून निर्यातबंदी आहे. आता ही बाहेरून आणलेली पार्सल आहेत त्यांची निर्यात करून टाका आणि अस्सल सोलापूरकरालाच निवडून देणार असे भाजपला बजावून सांगा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

…तर देश पेटून उठेल

ज्या संविधानावर हात ठेवून पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली त्या संविधानाची मोडतोड करण्यासाठी हात घालूनच दाखवा, संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. आरक्षण पाहिजे म्हणून अनेक समाज गेली अनेक वर्षे रस्त्यावर उतरलेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिले होते की सरकार आल्यावर आरक्षण देऊ, पण त्यांच्यानंतरची भाजपाची सरकारे आरक्षण द्यायला तयार नाहीत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. आरक्षण देणे हे लोकसभेच्या हातात आहे. ज्या पद्धतीने केजरीवाल सरकारचे अधिकार लोकसभेत कायदा बनवून काढून घेतलेत तसा निर्णय आरक्षणाच्या बाबतीत का घेतला नाही याचे स्पष्टीकरण मोदींनी उद्याच्या धाराशिवमधील सभेत द्यावे, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. मोदी सरकार आरक्षण काढेल हीच भीती लोकांच्या मनात आहे असे सांगतानाच, महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली याबद्दल मोदींना आकस आहे, बाबासाहेबांना लोक देव मानतात, पण मला मानत नाही, अशी खंत त्यांच्या मनात आहे, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदींना सेक्स स्कॅण्डलवाल्यांची घराणेशाही चालते का?

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना हा सेक्स स्कॅण्डलप्रकरणी गोत्यात आला आहे. त्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीत रेवन्ना याची काँग्रेस युवा नेते श्रेयस एम पटेल यांच्याशी थेट लढत होती. पण त्याचे पोर्न व्हिडियो व्हायरल झालेत आणि मोदी म्हणाताहेत की प्रज्ज्वलला मत दिले तर मला मिळेल. हीच संस्कृती जपलीत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला. मोदींना कडवट शिवसैनिक चालत नाही, शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही चालत नाही, पण सेक्स स्क@न्डलवाल्यांची घराणेशाही मात्र चालते, असा जबरदस्त भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कमळात नुसता मळ उरलाय

आज सोलापुरात पंतप्रधान मोदींचीही सभा झाली. त्यावेळी मोदींनी पुन्हा नकली शिवसेना असे तारे तोडले. याचा जोरदार समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. कालपर्यंत तुम्ही आमचे प्रेम अनुभवले आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचे कमळ कसे कोमजते ते बघा. तुमच्या कमळामध्ये नुसते मळ राहिले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

हिंमत असेल तर तुळजाभवानीचे नाव घेऊन भाषण करा

मोदी उद्या धाराशिवला येताहेत. त्यांच्या लेखी ते उस्मानाबाद आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारका द्वारका म्हणून नाटक करून आला होतात आता उद्या धाराशिवला येताय तर भवानीमातेचे दर्शन घेऊन या. आजपर्यंत तुम्ही कधी घेतले नाहीत. निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरूवात करताना तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन असे काहीतरी बोला. नाहीतर तुमच्या मनात भवानीमातेबद्दल आकस आहे असे महाराष्ट्र समजेल. आणि बोललात तर निवडणूक आयोग जो तुमचा घरगडी आहे त्याला सांगा की शिवसेनेच्या मशालगीतातला आक्षेप बाजूला काढ. भवानीचे नाव घेतल्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर मोदींवरही झाला पाहिजे. महाराष्ट्र वाट पाहतोय, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

…तो टरबुजा नव्हे दिवाळीत चिरडता ते चिराट आहे!

उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचीही टर उडवली. त्यांनी जनसमुदायालाच त्याबाबत विचारले. टरबूज म्हणजे कोण… फडणवीस. मध्यंतरी मी त्यांना फडतूस म्हणालो होतो ते. पण आता मी बोलत नाही. मी कलंकही बोललो होतो. पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला. टरबूज असते ते उन्हाळ्यात कामी तरी येते, पण हे टरबूज नाही दिवाळीत पायाखाली चिरडता ते चिराट आहे. आता तर ते पाव उपमुख्यमंत्री झालेत. होता केवढा आणि झाला केवढा अशी मिश्किलीही उद्धव ठाकरे यांनी केली.

– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या निर्भेळ मैत्रीचा दाखला उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. दोघांमध्ये मतभिन्नता होती पण ती त्यांनी सगळ्यांसमोर मांडली आणि मैत्रीही जपली. हल्लीचे मित्र हे पाठीत वार करणारे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.