उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चार वर्षात एकही दंगल नाही? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा खोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने नुकतीच चार वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये सर्व आलबेल असून गेल्या चार वर्षात एकही दंगल झाली नाही, तसेच शांततेत सर्व उत्सव साजरे करण्यात आले असा दावा केला. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचे निष्पण्ण झाले आहे. तसेच विधानसभेत त्यांनी दिलेल्या एका उत्तरामुळे हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

द क्विंटने याबाबत वृत्त दिले आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषनच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 5 हजार 714 वेळा दंगली झाल्या. 2018 मध्ये राज्यात 8 हजार 990 दंगली झाल्या होत्या. इतकेच नाही तर 2017 साली उत्तर प्रदेशचा दंगलीत पहिला क्रमांक लागतो असे सरकारने लोकसभेत म्हटले होते. 2014-15 नंतर उत्तर प्रदेशमध्ये दंगलीचे प्रमाण कमालीचे वाढले होते.

उत्तर प्रदेशमध्ये चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की राज्यात गेल्या चार वर्षात एकही दंगल झाली नाही. परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये समाजवादी पक्षाचे आमदार राकेश सिंह यांनी नागरिकत्व कायद्यावरून प्रश्न विचारला होता. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यात राज्यात झालेल्या दंगलीत 21जणांचा मृत्यू झाला आहे. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत 400 पोलीस जखमी झाले असून 61 पोलीस कर्मचार्‍यांना गोळी लागून जखमी झाले होते.

इतकेच नाही तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात शांतपणे सण आणि उत्सव साजरे केले जातात असा दावा केला होता. पण पीलीभीतमध्ये 2019 साली एका उत्सवादरम्यान दोन गटांत हाणमारी झाली होती, या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते.

सप्टेंबर 2018 मध्ये योगींच्या गोरखपूर जिल्ह्यात पोलीस आणि जमावामध्ये हिंसा झाली. यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

ऑक्टोबर 2017 मध्ये मोहर्रम दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिंसा झाली होती. बलिया जिल्ह्यात सहा जण जखमी झाले होते, तर चार दुचाकींना आग लावण्यात आली होती. कानपूरमध्ये झालेल्या हिंसेत ३0 जण जखमी झाले होते तर 10 गाड्यांना आग लावण्यात आली होती. तसेच अनेक दुकांनांची तोडफोड करण्यात आली होती.

एकूणच फक्त माध्यमांती बातम्याच नव्हे तर सरकारी माहिती आणि आकडेवारीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.