
कॅनडा सध्या कोरोना लस आणि निर्बंधांविरोधात मोठ्या निषेधांशी झुंज देत आहे. ट्रकचालकांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी कॅनडाची राजधानी ओटावा येथे ट्रक अडवले. तसेच कॅनडा-अमेरिका क्रॉसिंगवरही ट्रक रोखण्यात आले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कॅनडाला आपत्कालीन कायदा लागू करावा लागला. याला प्रतिक्रिया देताना अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना शांततेने आंदोलन करण्याच्या लोकांच्या अधिकाराचा आदर करावा, असे आवाहन केले आहे.
हिंदूपॅक्ट संस्थेचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती म्हणाले, “कॅनडातील निदर्शने आणि त्यांना दडपण्यासाठी केलेल्या कठोर पद्धती आणि उपाययोजनांबद्दल ऐकून मला वाईट वाटते. तिथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे आणि आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी खूप चिंतित आहोत.
हिंदूपॅक्टने एक निवेदन जारी करून ट्रूडो यांना शांततेने निषेध करण्याच्या कॅनडाच्या लोकांच्या अधिकाराचा आदर करावा असे आवाहन केले.
कोणत्याही लोकशाहीत शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे हिंदू संघटनेने म्हटले आहे. कॅनडामधील मतभिन्नतेचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणीच्या आदेशाची घोषणा हे एक दुःखद उदाहरण आहे.
हिंदुपॅक्टने ट्रूडो आणि न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) नेते जगमीत सिंग यांना “स्वस्तिक” हे नाझी चिन्ह “हकेनक्रेज” बरोबर न जोडण्याचे आवाहन केले. स्वस्तिक हे हिंदू, बौद्ध अनुयायी, शीख आणि जगभरातील इतर अनेक समुदायांसाठी एक प्राचीन आणि शुभ प्रतीक मानले जाते.
ट्रूडो आणि जगमीत सिंग या दोघांनीही अलिकडच्या दिवसांत आंदोलकांवर “स्वस्तिक झळकण्याचा” आरोप करत विधाने केली होती.
उत्सव चक्रवर्ती म्हणाले, ‘आमचे म्हणणे आहे की चुकीच्या विधानांमुळे हिंदू आणि शीख यांच्या विरोधात द्वेषाची भावना निर्माण होईल. कॅनडामध्ये गेल्या महिनाभरात सहा हिंदू मंदिरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली.’




























































