
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव पचवू शकलेले नाही, असे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत त्याचा प्रत्यय आला. डोनाल्ड ट्रम्प आपल्या एका मित्राच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यांनी राजकीय भाषण सुरू केले. त्यांनी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका केली. त्यानंतर मित्राला एका ओळीत शुभेच्छा देत त्यांनी काढता पाय घेतला.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ते आता फ्लोरिडातील मार ए लागो रिसॉर्टमध्ये राहत आहेत. याच रिसॉर्टमध्ये होणाऱ्या त्यांच्या मित्राच्या लग्न समारंभात ते सहभागी झाले होते. लग्नाच्या ठिकाणी पोहचताच त्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि उपस्थितांना विचारले तुम्हांला माझी आठवण येते का, त्यांच्या या प्रश्नावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ट्रम्प यांचा उत्साह वाढला. त्यांनी थेट राजकीय भाषणाला सुरुवात केली. बिजनेस इनसायडरने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विवाह समारंभात सर्वाचे लक्ष नवदाम्पत्यांकडे असते. मात्र, आपला मित्र मोगन नोडरर आणि जॉन एरिगो यांच्या लग्नात ट्रम्प यांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. टाळ्यांच्या प्रतिसादाने ट्रम्प यांचा उत्साह वाढल्याने त्यांनी अमेरिका-मेक्सिको सीमा, चीन, ईराणसोबतचे संबंध या मुद्द्याचा उल्लेख करत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका केली.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीत ट्रम्प यांचा बायडन यांनी 70 लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर या निवडणुका आणि निकाल अवैध ठरवण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर ट्रम्प यांनी एका ओळीत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तुमची जोडी सुंदर आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी या समारंभातून काढता पाय घेतला. मात्र, विवाह समारंभात ट्रम्प यांनी केलेल्या राजकीय भाषणाची चर्चा सुरू होती.




























































