आध्यात्माची सांगड परिवर्तनाशी घालणारा विचार चक्रधरांनी मांडला- उत्तम कांबळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

सध्या समाजात धर्मवाद, जातीयवाद आणि मूलतत्त्ववादाने उग्र रूप धारण केले आहे. देशाच्या शत्रूला आणि वाईट विचार नष्ट करण्याऐवजी माणसालाच नष्ट करण्याची भाषा बोलली जात आहे. माणसे मारायला आता कोणतेही कारण लागत नाही. महिलांवरही आरोप करून पापी ठरवून बहिष्कृत करण्यात येत आहे. मूलतत्त्ववादाला विरोध करण्याची क्षमता केवळ चक्रधर स्वामींच्या विचारात असून ते विचार समाजात पोहोचविण्याची गरज ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली. खानापूर नगर पिंगळीरोड श्रीकृष्ण दत्त मंदिरात महाचिंतनी सोहळ्याचे उद्घाटक म्हणून कांबळे बोलत होते.

माणसाला ज्या काळात हीन लेखले जात होते, त्याला कवडीचेही मूल्य नव्हते. अशा काळात समाज परिवर्तनाची जाणीव करून देण्याचे कार्य चक्रधर स्वामी यांनी केले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने क्रांतिकारी संत होते. तेराव्या शतकात मराठी भाषेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार लोकांना समजावून सांगितले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा हे चक्रधरांनी स्पष्ट केले. चक्रधरांच्या तत्त्वज्ञानाला नव्या रूपात मांडून ते समाजापुढे आणावी लागेल. चक्रधर स्वामी हे तळपणारे हत्यार असून त्याला गंज लागणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल असेही कांबळे यांनी सांगीतले. अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम कारंजेकर यांनी समाजाच्या उत्थानासाठी स्वामी चक्रधर यांनी मोलाचे कार्य केल्याचे सांगून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम 11 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानिमित्त महाचिंतनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.